नांदेड - कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात अद्याप आढळलेला नाही. परंतु, या पुढील काळातदेखील निष्काळजीपणा होऊ नये, म्हणून जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. सध्या तरी त्यात कुठलीही शिथिलता देण्यात आलेली नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले.
नांदेड : जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही, मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता नाहीच - जिल्हाधिकारी - relaxation in lockdown
नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण अद्याप आढळलेला नाही. परंतु, या पुढील काळात देखील निष्काळजीपणा होऊ नये, म्हणून जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात कोणतीही शिथिलता आणली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले आहे.
२० तारखेनंतर सरकारच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. कोरोनाच्या संकटापासून आपला बचाव करण्यासाठी लॉकडाऊन हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी यापुढे देखील कडक करावी लागणार आहे. यात आपल्याकडून निष्काळजीपणा झाला तर त्याचे परिणामदेखील आपल्याला भोगावे लागतील. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सध्या तरी कोणतीही शिथिलता देण्याचा विचार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
केवळ रुग्णालये, औषधी दुकाने, किराणा तसेच इतर अत्यावश्यक बाबींना लॉकडाऊनमध्ये मर्यादित वेळेसाठी सूट देण्यात आली आहे. त्यानंतर आता कृषी विभागाशी संबंधित खते, बियाणे, कीटकनाशक औषधी विक्रीच्या दुकानांना परवानगी देण्यात येईल, तसेच जिल्ह्यातील कापूस खरेदीकेंद्रही सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. विपीन यांनी या वेळी सांगितले. सीसीआयच्या ग्रेडींगनुसार शेतकऱ्यांचा उच्च प्रतीचा कापूस खरेदीकेंद्रावर देण्यात यावा तसेच हलक्या प्रतीचा कापूस स्थानिक व्यापाऱ्यांकडे देण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, याबाबतीत व्यापारी व आडते यांच्याकडून कुठेही शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.
किनवट सीमावर्ती भागाचा दौरा....
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी बुधवारी किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेलगतच्या भागाचा दौरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील आरोग्य विषयक सुविधा तसेच लॉकडाऊनच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजना या बाबींचा त्यांनी या वेळी आढावा घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर या वेळी त्यांच्यासोबत होते. मंगळवारी त्यांनी बिलोली, धर्माबाद तालुक्यातील सीमावर्ती भागाचा दौरा केला होता. मुख्य रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करून शेजारील राज्यातून येणाऱ्यांना रोखले जात आहे. परंतु, ग्रामीण भागात गाडीरस्ता तसेच पाऊलवाट या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना आवरण्यासाठी स्थानिक पातळीवर ग्राम संरक्षक दल स्थापन करून त्यामार्फत उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉ. विपीन यांनी दिली.