महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अशोक चव्हाणांना पराभूत करण्यासाठी भोकरमध्ये राहूल गांधीची सभा घ्यावी; फडणवीसांचा टोला

भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार बापूसाहेब गोरठेकर यांच्या प्रचारार्थ सोमवारी बारड येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत, राहुल गांधी जेथे जेथे सभा घेतात तेथे काँग्रेसचा उमेदवार पराभूत होतो. म्हणूनच, अशोक चव्हाणांना पराभूत करण्यासाठी राहूल गांधीनी भोकर मतदारसंघात प्रचारसभा घ्यावी, असा उपरोधिक टोला फडणवीस यांनी लगावला.

By

Published : Oct 14, 2019, 11:20 PM IST

प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस

नांदेड - महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू असताना काँग्रेस नेते राहूल गांधी बँकॉकला जावून 'ऐश' करत होते. त्यांना काँग्रेसच्या पराभवाची स्पष्ट चाहूल लागली असल्याचे दिसते. शेवटी काँग्रेस नेत्यांनी त्यांना परत येण्याची विनंती केल्याने ते महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रचार सभेला आले. मात्र, यात बोलताना गेल्या ७० वर्षात देशाचे वाटोळे झाले आहे, असे त्यांनी स्वतः होवून कबूल केले. परंतु या ७० वर्षांपैकी ६० वर्षे काँग्रेसची सत्ता होती, हे ते विसरले असावेत. ते जेथे जेथे सभा घेतात तेथे काँग्रेसचा उमेदवार पराभूत होतो. म्हणूनच, अशोक चव्हाणांना पराभूत करण्यासाठी राहूल गांधीनी भोकर मतदारसंघात प्रचारसभा घ्यावी, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारड येथील प्रचारसभेत बोलताना लगावला.

प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस

भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार बापूसाहेब गोरठेकर यांच्या प्रचारार्थ १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, बारड हे स्वातंत्र्य सैनिक साहेबराव देशमुख यांची कर्मभूमी आहे. त्यांनी तयार केलेला रोहयोचा अभ्यास पूर्ण अहवाल आजही विधानसभा सभागृहात राखून ठेवण्यात आलेला आहे. त्याचनुसार आजही रोहयोचे काम करण्यात येते, आम्ही सदैव त्यांचा गौरव करतो. परंतू, याच स्वातंत्र्य सैनिकांचा चव्हाण कुटुंबानी जिवंतपणी व त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा अवमान केला आहे. त्याचा बदला घेण्यासाठी आता आगामी निवडणुकीत अशोक चव्हाणांना पराभूत करा, असे भावनिक आवाहन फडणवीसांनी केले.

हेही वाचा - भाजप केवळ आश्वासनाचे सरकार - अशोक चव्हाण
सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीची अवस्था 'इस दिल टूकडे हजार हुये...कोई यहां गिरा कोई वहां गिरा' अशी झाली आहे. तसेच काँग्रेसच्या चव्हाण यांना पुन्हा एकदा घरचा रस्ता दाखवा आणि बापूसाहेब गोरठेकरांना विधानसभेत पाठवा. भाजपचे सरकार प्रत्येक समाजाच्या पाठीशी उभे राहील. १५ वर्षात जेवढा विकास काँग्रेसने केला नाही त्यापेक्षाही दुप्पट विकास कामे आम्ही ५ वर्षांत केला आहे. शेतकऱ्यांना सर्वात मोठी कर्जमाफी दिली. दुष्काळ, विमा, विहीर यांसह विविध योजनेसाठी आम्ही पैसे दिले. शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपयांची मदत विविध माध्यमातून केली आहे. मराठवाड्यातील सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला. दुष्काळी मराठवाड्यासाठी जलयुक्त शिवार योजना आणली. यापुढे कोकणातून वाहून जाणारे पाणी हे पाणी उचलून गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी योजना तयार केली. आपल्या वाटणीचे १०२ टीएमसी पाणी नवीन धरण तयार करून साठवायचे आहे, मराठवाड्यातील सर्व धरणे पाईपलाईने जोडायची आहेत. २० हजार कोटीचे टेंडरसुद्धा काढले आहेत. पुढच्या ५ वर्षात कुठलाही दुष्काळ राहणार नाही या योजनेसाठी पैसे कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचा - जिल्हा परिषदेच्या शाळांना साहित्याचा पुरवठा; वापर मात्र नाहीच
मराठवाड्यासाठी अशोक चव्हाण यांनी कसलेही प्रयत्न केले नाहीत. परंतु आम्ही ५ वर्षांत ३० हजार किमीचे ग्रामीण रस्ते तयार केले आहेत. २० हजार राज्य व राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणार आहेत, ७ लाख घरे दिली आहेत. २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा आमचा मानस आहे. ३ लाख लोकांना जमिनीचा मालकी हक्क दिला, प्रत्येक घरी गॅस पोहोचवला आहे. शिक्षण दर्जेदार करण्याचे काम सरकारने केले आहे. सगळ्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न केले. ४० लाख लोकांचे मोफत आरोग्य उपचार दिले, पंतप्रधान मोदींनी ३७० सारख कलम हटवून देशाला एकसंघ केले. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग झाला आहे, हे संपूर्ण जगाला पटवून दिले असे मुख्यमंत्री सभेत बोलताना म्हणाले. यावेळी व्यासपीठावर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भास्करराव पाटील खतगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, बापूसाहेब गोरठेकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, प्रवीण साले, चैतन्य बापू देशमुख, बबनराव बारसे आदी उपस्थित होते.

पक्ष प्रवेश - आमच्यावर टीका न करता 'त्यांनी' विकासाच्या नावावर मतदान मागावे - खासदार चिखलीकर

याच सभेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. किशोर देशमुख, मीनाक्षी देशमुख, लक्ष्मीबाई साखरे, शिवराज जाधव व काँग्रेसचे लोणी बु.चे सरपंच अशोक बुटले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा - ....खरे तर आरामाची गरज भाजपच्या उमेदवारालाच - अशोक चव्हाण

ABOUT THE AUTHOR

...view details