महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बड्या अधिकाऱ्याच्या पुत्राला वाचवण्यासाठी उभा केला 'डमी'चालक, पोलीस ठाण्यात तणाव - अपघात

या प्रकरणात डमी चालक समोर आणल्याचे लक्षात येताच जमाव चांगलाच संतप्त झाला होता. या घटनेतील मूळ चालक आणल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतल्याने भाग्‍यनगर पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

police
पोलीस ठाण्यात तणाव

By

Published : Feb 8, 2020, 9:46 PM IST

Updated : Feb 8, 2020, 11:15 PM IST

नांदेड - शहरात एका बड्या अधिकाऱ्याच्या पुत्राने तरुणाला कारने चिरडल्याचा संतापजनक प्रकार आज घडला. या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तरुणाला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी चक्क डमी चालक पोलीस ठाण्यात हजर केल्याची घटना आज पहावयास मिळाली. हा प्रकार मृताचे नातेवाईक आणि जमावाने हाणून पाडला.

बड्या अधिकाऱ्याच्या पुत्राला वाचवण्यासाठी उभा केला 'डमी'चालक, पोलीस ठाण्यात तणाव

या प्रकरणात डमी चालक समोर आणल्याचे लक्षात येताच जमाव चांगलाच संतप्त झाला होता. या घटनेतील मूळ चालक आणल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतल्याने भाग्‍यनगर पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा - सारखे सांगून समजत नसेल तर धडा शिकवावा लागतो, पवारांचा भाजपला टोला

नांदेड शहरातील डीमार्ट रस्त्यावरील चांदोजी मंगल कार्यालयापुढे शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास चांदू रघुनाथ सूर्यवंशी या तरुणाला कारने (एम एच २६ एएफ ३९२) जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर कार चालक फरार झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतहेद ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मृताच्या कुटुंबीयांनी घेतला होता. त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फसके, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनुरुद्ध काकडे हे आपल्या लवाजम्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, जमावाने आधी आरोपीला अटक करा, मग मृतदेह उचलू, असा निर्वाणीचा इशारा दिल्याने भाग्यनगर पोलिसांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता.

हेही वाचा - फटाक्यांच्या स्फोटात पंजाबमध्ये 15 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

त्यात पोलिसांनी अपघातातील कार पंचनामा न करताच भाग्यनगर पोलीस ठाण्यात आणल्याने जमावाचा राग अनावर झाला. मृतदेह उचलण्याआधीच कार कशी काय हलवली, म्हणून संतप्त जमावाने या परिसरात दगडफेक केली. ट्रीगार्डचीही तोडफोड केली. याशिवाय पोलीस ठाण्याच्या परिसरात रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे परिसरातील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड हे पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी जमावाशी चर्चा न करता आमदारांना चर्चेसाठी बोलावल्याने जमाव संतप्त झाला.

हेही वाचा - प्रियांका गांधींच्या मुलाने पहिल्यांदा केले मतदान, म्हणाला...

भाग्यनगर पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत असताना पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचे सांगितले. त्यावेळी जमावाने आम्हाला चालक पाहू द्या, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी चालकाला जमावासमोर उभे केले. यावेळी तो चालक अपघाताशी संबंधित नसल्याचे जमावाने सांगितल्यानंतर पोलिसांचीही तारांबळ उडाली. एवढेच नाही, तर ज्या डमी चालकाला लोकांसमोर हजर करण्यात आले, त्याने स्वतः 'मी अपघातातला चालक नाही मला तहसीलदार बाईंनी पाठवल्यामुळे मी इथे आलो' असे सांगितल्याने पुन्हा एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेतील मूळ चालकाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर मयताच्या कुटुंबीयांनी मृतदेह घटनास्थळावरून हलवला. याप्रकरणी तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Last Updated : Feb 8, 2020, 11:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details