नांदेड - गुजरातचा पुळका असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने २० जुलै २०१७ रोजी गोदावरीचे पाणी गुजरातला देण्याचा निर्णय घेतला. हे सूर्य प्रकाशाइतके सत्य असताना आता ते चक्क खोटे बोलत आहेत. जरी भाजप सरकारने असा निर्णय घेतला असला तरी आम्ही मात्र एक थेंब पाणी गुजरातला देणार नाही, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी, रिपाइं (गवई गट), शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ भोकर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस कोणत्याही विषयात खोटे बोलतात. त्यांच्याकडे माहिती कमी आणि खोटे बोलणे जास्त असते. अशाच प्रकारे गोदावरीच्या पाणी प्रकरणात त्यांनी नांदेडमध्ये येऊन धादांत खोटे विधान केले. गोदावरीचे पाणी महाराष्ट्रालाच मिळाले पाहिजे, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असताना फडणवीस यांनी सन २०१० साली काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे खोटेच सांगितले. मुळात आघाडी सरकारने हा निर्णय कधी घेतलाच नव्हता. अगोदरच भाजप सरकारने युपीपीचे पाणी वरच्या भागात नेऊन नांदेड जिल्ह्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे गोदावरीचे पाणी गुजरातला देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी सांगितले.
भाजपला माझी भिती -
खासदार अशोक चव्हाण म्हणाले, भाजपला माझी भिती वाटत आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडला येऊन गेले. आता नितीन गडकरी आणि पियुष गोयल येत आहेत. केवळ 'खोटे बोल, पण रेटून बोल' या पध्दतीने वागून विकास होत नसतो. त्यासाठी प्रत्यक्ष काम करावे लागते. मात्र, आम्ही कामे करायची आणि श्रेय भाजपने घ्यायचे हाच प्रकार सुरू असून यापुढे असा प्रकार चालणार नाही, असे चव्हाण यांनी निक्षून सांगितले.
चव्हाण म्हणाले, की भोकरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काँग्रेसने सोडविला आहे. आधी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला. आता ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लघुसिंचन प्रकल्प, नाला सरळीकरण, तलावातील गाळ काढणे, कोल्हापुरी बंधारे बांधणे या माध्यमातून अनेक प्रकल्प आकारास येत आहेत. विकासाची गंगा या भागात वाहत असताना विरोधक मात्र जाती पातीचे राजकारण करून मला अडचणीत आणण्याचे काम करीत आहेत. जनता त्यांचे मनसुबे कदापीही पूर्ण होऊ देणार नाही, असेही चव्हाण यावेळी म्हणाले. या जाहीर सभेला भोकर शहर व तालुक्यातील जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी उमेदवार खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, किशोर गजभिये, पप्पु पा. कोंढेकर, जगदीश पा. भोसीकर आदी उपस्थित होते.