नांदेड- मागील काही महिन्यांपासून राज्यभर गाजत असलेल्या धान्य घोटाळ्यात दोन वाहतूक पुरवठाधारकांसह एका उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या घोटाळ्याची तार आता जिल्हा पुरवठा विभागापर्यंत पोहचली असून या विभागातील ४ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या गोदामातून निघालेले धान्य तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर या दोन्हीकडच्या नोंदीत तफावत आढळून आली. त्यामुळे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने पुरवठा विभागातील चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अव्वल कारकून रमेश भोसले, रत्नाकर नारायण ठाकूर, गोदामपाल इस्माजी नागोराव विप्तल व हदगाव गोदामपाल विजय मारोतराव शिंदे यांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यातील धान्य घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे गेल्यानंतर मागील महिन्यात नांदेड व लातूर येथील उद्योजकासह व्यवस्थापकास अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. अटक करण्यात आलेले चार जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. असे असले तरी सीआयडीच्या तपासणीत आणखी कोणकोणते मासे जाळ्यात अडकतात याची चर्चा होत होती. दरम्यान, या प्रकरणात पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या दोन अव्वल कारकुनासह अन्य दोन गोदामपालाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.