नांदेड- नांदेड जिल्हा परिषदेच्या एकूण सहा बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे दोन कार्यकारी अधिकारी आणि अन्य चार अधिकाऱ्यांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेड जिल्हा परिषदेतील सहा जणांवर वजिराबाद पोलीस ठाण्यात अॅट्रॉसीटीसह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती देताना तक्रारदार परमेश्वर गोणारे
नांदेड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, अशोक शिनगारे, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजी खुडे, जाफर पटेल आणि टर्के यांनी संगनमताने खोटी माहिती असलेला अभिलेख तयार केला. तसेच तो खरा आहे, असे सांगून वापर केला. तसेच नांदेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी परमेश्वर गोणारे यांना शासनाचे बेकायदेशीर आदेश निर्गमित करून मानसिक त्रास दिला. तसेच त्यांना आर्थिक शास्तीचे बेकायदेशीर आदेश निर्गमीत करून या संदर्भात प्रशासकीय व न्यायिक प्रक्रियेत खोटी माहिती सादर करून गोणारे यांना लोकसेवकांकडून मानसिक व आर्थिक छळ एप्रिल, 2016 पासून आजपर्यंत करण्यात आल्याचे गोणारे यांनी सांगितले.
अभिमन्यू काळे हे जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांच्या काळात बऱ्याच जणांना जातीय द्वेशाला बळी पडावे लागले. नांदेड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांची नांदेड येथील कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यावेळी त्यांच्या विरोधात एका राष्ट्रीय पक्षाने आंदोलन करून त्यांना निलंबीत करावे, अशी मागणी लावून धरली होती. परंतु, त्यांना यश आले नाही. यात परमेश्वर गोणारे यांनाही त्रासून सोडले. शेवटी गोणारे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. प्रथमवर्ग न्यायालयाने हे प्रकरण रद्द करून गोणारे यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर गोणारे यांनी पुनर्विलोकन याचिका दाखल केली. न्यायालयाने यात तांत्रीक बाबी तपासून विभागीय कार्यालयाचे अतिरिक्त आयुक्त यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. यावरून परमेश्वर गोणारे यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिसांनी वरील अधिकाऱ्यांविरूध्द अॅट्रॉसीटीसह आदी कलमान्वये गुहा दाखल झाला असून पुढील तपास नांदेड शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के करीत आहेत.
हेही वाचा - नांदेडमध्ये पतीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पत्नीने केली आत्महत्या