नांदेड- बनावट जातीच्या प्रमाणपत्रावर नोकऱ्या व राजकीय पद उपभोगणारे असतील तर "त्या" संवर्गातील मूळ प्रवर्गावर अन्याय होतो. अशीच घटना सोनखेड गटातील जि. प. सदस्या बाबत उघड झाली आहे. काँग्रेसच्या जि. प. सदस्या अंकिता देसाईराव देशमुख-मोरे यांचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले आहे. त्या प्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहा तालुक्यातील सोनखेड गटातून अंकिता देसाईराव देशमुख-मोरे या जि. प. साठी निवडून आल्या होत्या. इतर मागासप्रवर्गात महिलांसाठी हा गट राखीव होता. जात मराठा देशमुख असताना त्यांनी मराठा 'कुणबी' जातीचे प्रमाणपत्र काढले व जात पडताळणी येथून त्या प्रमाणपत्राची जात वैधता करून घेतल्याचे कागदपत्र निवडून आल्यानंतर सादर केले.
माजी पं. स. सदस्य विजय विठ्ठलराव शेटकर यांनी अप्पर विभागीय आयुक्त औरंगाबाद त्यांच्याकडे या बनावट जात वैधता प्रमाणपत्राची तक्रार नोंदविली. अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी २९ जानेवारी २०१९ रोजी विजय शेटकर विरूद्ध अंकिता देशमुख यांच्या सुनावणीचे आदेश दिले होते. अमरावती जात पडताळणी समितीने प्रत प्राप्त झाली नाही तसेच या कार्यालयातून अंकिता देसाई देशमुख-मोरे यांचे जात वैधता प्रमाणपत्र निर्गमितच झाले नाही असा निर्णय दिला.