नांदेड : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणात अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे या योजनांची भुरळ सीमावर्ती भागातील काही गावांना पडली. त्यातच त्यांनी आपली गावे तेलंगणात समाविष्ट करण्याची मागणी केली. त्यासाठी समन्वय समितीने सीमावर्ती भागात संपर्क संवाद अभियानही राबविले. मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमावर्ती भागातील गावांसाठी विशेष योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, या सर्व घटनाक्रमात बीआरएसच्या महत्त्वाकांक्षा मात्र वाढल्या आहेत.
केसीआरच्या सभेसाठी जागेची पाहणी : तेलंगणाच्या बाहेर आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी बीआरएसला नांदेड हे सोयीचे वाटते. विशेष म्हणजे यापूर्वी एमआयएमने ही तेलंगणाबाहेर नांदेडातूनच सुरुवात केली होती. या पक्षाला २०११ च्या महापालिका निवडणुकीत चांगले यशही मिळाले होते. परंतु, त्यानंतर पक्षाला हे यश टिकविता आले नाही. त्याच धर्तीवर बीआरएसनेही नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच बीआरएसच्या नेत्यांनी नांदेडात मुख्यमंत्री केसीआरच्या सभेसाठी जागेची पाहणीही केली होती.
आता फेब्रुवारीचा मुहूर्त : आता फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता शिथिल झाल्यानंतरच बीआरएस महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात उतरणार आहे. त्याचा फटका कुणाला बसतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील धर्माबाद, बिलोली, किनवट, माहूर, देगलूर आणि भोकर या तालुक्यांमध्ये तेलगू भाषिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत तेलगू भाषिकांवर बीआरएसची अधिक मदार राहणार आहे.