नांदेड: आंध्र प्रदेशातून वेगळ्या झालेल्या तेलंगणा राज्यात मागील नऊ वर्षांपासून मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएस पक्षाची सत्ता आहे. त्यांच्या सत्ताकाळात तेलंगणात आरोग्य, शिक्षण, उद्योग, कृषी आदी घटकांसाठी केलेल्या कामाची भुरळ सीमावर्ती भागातील गावांना पडत आहे. त्यामुळे तेलंगणाला लागून असलेल्या महाराष्ट्रासह इतर राज्यातील काही गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा दर्शविली. त्यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बिलोली, किनवट, भोकर तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. परंतु, कायद्यामध्ये तशी तरतुद नाही.
पक्षाची व्याप्ती वाढविणार:दरम्यान, मुख्यमंत्री केसीआर यांनी टीआरएसचा विस्तार देशभर करण्याचे नियोजन केले. त्यासाठी तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव भारत राष्ट्र समिती करण्यात आले. या बीआरएस पक्षाच्या माध्यमातून के. सी. आर आता देशभरात आपल्या पक्षाची व्याप्ती वाढविणार आहेत. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून त्यातही नांदेड जिल्ह्यातून होत आहे. त्या अनुषंगाने बीआरएसच्या नेत्यांनी तयारी चालविली आहे. मागील काही दिवसांपासून सीमावर्ती भागातील गावात भेटीगाठी आणि कार्यक्रम वाढले आहेत. त्यातच आता नांदेड शहरात रविवार ५ फेब्रुवारी मुख्यमंत्री के. सी. आर हे स्वतः सभा घेणार आहेत. त्यावेळी ते महाराष्ट्रातील जनतेला तेलंगणा सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्याबरोबरच देशात काय करणार? याविषयीची सखोल माहिती देतील, असे बीआरएसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
नेते मंडळींनी ठोकला नांदेडमध्ये तळ: सभेला अधिकाधिक लोक यावेत, यासाठी बीआरएसचे जहीराबाद येथील खासदार बी. बी. पाटील, चेन्नूरचे आमदार बालका सुमन, बोधनचे आमदार शकील अहमद, माजी महापौर तथा सिव्हिल सप्लाय चेअरमन रविंदर सिंघ आदी नेते मंडळी नांदेडात तळ ठोकून आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागात राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्या घरी बीआरएसचे आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नियोजन होत आहे.