नांदेड -कंधार तालुक्यातील लालवाडी परीसरात कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ मे रोजी अज्ञात व्यक्तीचा फाशी घेतलेल्या आणि सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. कमरेच्या खालील अर्ध्या शरीराचे रानटी प्राण्याने लचके तोडले आहेत. अज्ञाताने ओळख पटवण्यासाठी कंधार पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयोगटातील मृतदेह -
७ मे रोजी माजी पोलीस पाटील रघुनाथ बापुराव गित्ते यांना एका व्यक्तीचा सडलेला मृतदेह लिंबाच्या झाडाला नायलान दोरीने फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळला. हा मृतदेह लालवाडी शिवारात गायरान जमिनीतील बाबू सवाजी गित्ते यांच्या शेताजवळ आढळून आला. या नंतर गित्तेंनी याची खबर कंधार पोलिसांना दिली.
जंगली प्राण्यांने अर्ध्या शरीराचे तोडले लचके -
दिलेल्या फिर्यादीवरुन कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गंगलवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. यू. गणाचार्य, पोलीस नाईक टाकरस व पोलीस हेडकॉन्स्टेबल वानरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. घटनास्थळी लिंबाच्या झाडाला अंदाजे पंधरा ते वीस दिवसापूर्वी फाशी घेतलेला अनोळखी व्यक्तीचे अर्धे शरीर लटकलेल्या आवस्थेत आढळून आला. या व्यक्तीच्या मृतदेहाचा कमरेच्या खालचा भाग जंगली प्राण्यांनी खालेल्या अवस्थेत दिसून आला.
ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे केले आवाहन -
दिलेल्या फिर्यादीवरुन कंधार पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांनी ओळख पटवण्यासाठी तत्काळ कंधार पोलिसात पोलीस निरीक्षक संग्राम जाधव8999881900 व8652756495 या भ्रमनध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.