महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'संकटकाळी माझे योगदान, मी करणार रक्तदान' संकल्पनेतून ५० जणांनी केले रक्तदान - कोरोना अपडेट

कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून सर्वच घटकांकडून खबरदारी घेतली जात आहे़. त्यातच रक्तदान केल्याने या विषाणूचा संसर्ग होवू शकतो, या भीतीने रक्तदाते सध्या रक्तदान करत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे.

blood donate by social workers
रक्तदान करताना सामाजिक कार्यकर्ते

By

Published : Mar 28, 2020, 1:40 PM IST

Updated : Mar 28, 2020, 2:39 PM IST

नांदेड- राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शहरातील विठ्ठल पावडे या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने 'संकटकाळी माझे योगदान-मी करणार रक्तदान' यांच्या संकल्पनेतून आतापर्यंत ५० जणांनी रक्तदान केले आहे. या संकल्पनेद्वारे रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी तरुणांनी पुढाकार घेतला असून गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिले जात आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी एकत्र येत, रक्तपेढीत जाऊन स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका सर्वच घटकांना बसत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून सर्वच घटकांकडून खबरदारी घेतली जात आहे़. त्यातच रक्तदान केल्याने या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, या भीतीने रक्तदाते सध्या रक्तदान करत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे राज्य शासनाने संचारबंदी लागू केल्याने पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे सामाजिक संस्थांना सध्या रक्तदान शिबिरे घेता येत नाहीत. मागील महिन्यात शिवजयंती व इतर कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिरे झाली होती. तो रक्तसाठा आजतागायत रुग्णांची गरज भागवत आहेत.

रक्तदान केल्यानंतर ते पुढील ४५ दिवसांपर्यंत वापरता येते. मात्र,प्लेटलेटचे आयुष्य पाच दिवसांचेच असते त्यामुळे सध्या प्लेटलेटची चणचण भासत आहे. तर येणाऱ्या काळात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब ओळखून नांदेड शहरातील तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत रक्तदानाचे आवाहन केले आहे. रक्तदान करू इच्छिणाऱ्याना पोलीस रस्त्यात अडवणार नाहीत याची खबरदारी म्हणून विठ्ठल पावडे, पप्पू पाटील कोंढेकर यांच्याकडून रक्तदात्यांना शिबीरस्थळी असलेल्या श्री हुजूर साहिब ब्लड बँकेत घेऊन जाणे आणि घरी आणून सोडण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे कोणतीही भिती न बाळगता रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तपणे ब्लड बँकेत जावून रक्तदान करावे, काही अडचण आल्यास ९०११७७९००० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नांदेड शहरात शासकीय रक्तपेढीसह श्री हुजूर साहिब नांदेड ब्लॅड बँक, श्री गुरू गोविंदसिंघजी ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक, जीवनआधार ब्लड बँक, नांदेड ब्लड बँक, पारसी अंजुबन ब्लड बँक, गोळवळकर गुरूजी ब्लड बँक आणि स्वामी विवेकानंद ब्लड बँक अशा नऊ रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांच्या माध्यमातून नांदेड शहरासह तालुक्यांच्या ठिकाणी आणि उमरखेड, म्हैसा आदी ठिकाणी रक्तपुरवठा करण्यात येतो. आजच्या स्थितीत जवळपास सर्वच बँकामध्ये रक्तसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, येणाऱ्या काळात रक्ताची चणचण भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्री गुरूगोविंद सिंघजी ब्लड बँकेतही रक्तसाठा उपलब्ध असल्याचे बँकेचे संचालक डॉ.प्रसाद बोरूळकर यांनी सांगितले.

डॉक्टर, पोलीस, मिलिटरी, आरोग्य कर्मचारी, प्रशासनातील कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. आपलीही काहीतरी जबाबदारी बनतेच! या भावनेतून 'संकटकाळी माझे योगदान' या संकल्पनेतून विठ्ठल पावडे यांनी शहरी भागातील रक्तदात्यांचे रक्तदान करून घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नांदेड जिल्ह्यात जवळपास ३०० रूग्ण थॅलेसिमिया आजाराचे असून त्यांना दर पंधरा दिवसाला रक्त द्यावे लागते. तसेच डायलिसिसच्या रूग्णांचीही रक्ताची गरज पूर्ण करावी लागते. त्यामुळे रक्तदनाची साखळी निरंतर चालणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीचा रक्तपेढ्यांनी गैरफायदा घेऊ नये म्हणून आरोग्य विभाग त्यांच्यावर करडी नजर ठेवून आहेत. तसेच ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अधिक पैसे घेणार नाही, याची काळजी घेतली जात आहे़.

Last Updated : Mar 28, 2020, 2:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details