नांदेड- निवडणुकीच्या काळात घरोघरी जावून मतदारांची माहिती घेणारे 'बिएलओ' आता स्वस्त धान्य दुकानात बसून लाभार्थ्यांना नियमानुसार अन्नधान्य दिले जाते की नाही, यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्याची उपासमार न होता त्यांना त्यांचे हक्काचे अन्नधान्य मिळावे, यासाठी प्रशासनकडून प्रयत्न केले जात असून अन्नधान्य वाटपात कुठलीही गडबड होवू नये, यासाठी प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात 'बीएलओ' ची नेमणूक करण्यात आली आहे.
यामुळे लाभार्थ्यांचा अंगठा घेवूनही माल न देणे, कमी अन्नधान्य देणे अशा प्रकारांना आळा बसणार आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी शासनाला 'लॉकडाऊन' सारखा कठोर निर्णय घ्यावा लागल्याने त्याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणारे हजारों कष्टकरी, कमगार व मजूर यांना बसला आहे. व्यवसाय, उद्योगधंदे बंद झाल्याने गरीव व सर्वसामान्य लोकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे अशा लोकांची अन्नधान्यावाचून उपासमार होवू नये, यासाठी त्यांना होणारा स्वस्ता धान्याचा पुरवठा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे नियोजन केले जात आहे.