नांदेड - राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असलेल्या नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. काँग्रेस 3, शिवसेना 4, राष्ट्रवादी 1, भाजप 1 असे चित्र आहे. एकेकाळी काँग्रेसचा गड अशी नांदेडची ओळख होती. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आणि लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील भाजपकडून खासदार झाले. त्यामुळे पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांची सत्त्वपरीक्षा आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजपची हीच विजयी घोडदौड कायम राहील का याबाबत साशंकता आहे.
हेही वाचा -आचारसंहिता लागताच पालिकेत पदाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शुकशुकाट
लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून वंचित आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खा.प्रताप पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भोवती केंद्रीत राहणार आहे. लोकसभेच्या वेळी थेट राष्ट्रवादावर मतदान झाले आणि लोकांनी 'फिर एक बार मोदी सरकार' म्हणत सेना-भाजपाला मतदान केले. मात्र, आता विधानसभा निवडणुकीतील मुद्दे पूर्णपणे वेगळे आहेत. सेना भाजपने जिल्ह्याला विकासाच्या बाबत सावत्र वागणूक दिली, असा आरोप काँग्रेसकडून अनेकदा झाला. हा आरोप खोडून काढण्याचे काम युती सरकारने केले नाही. त्यामुळे युतीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण आहे, असे चित्र आजघडीला तरी नाही. तर दुसरीकडे काँग्रेसची देखील परिस्थिती फारशी समाधानकारक नाही.
हेही वाचा -एमआयएम विधानसभेच्या 20 टक्के जागा लढवणार - इम्तियाज जलील
स्वत: अशोक चव्हाण हे आपल्या भोकर मतदारसंघातच पूर्णवेळ व्यस्त आहेत. त्यांनी तिथच गुंतून राहावे यासाठी भाजपने निवडणुकीसाठी बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना पुढे केलो आहे. त्यामुळे चव्हाण आतापासूनच भोकरमध्ये अडकून पडले आहेत. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेस-३ , शिवसेना-४, राष्ट्रवादी-१, भाजप-१ असे चित्र होते. त्यापैकी नांदेड-दक्षिणचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील आता हिंगोलीचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर तत्कालीन सेनेचे लोहा-कंधारचे आमदार असलेले प्रताप पाटील आता नांदेडचे भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले आहेत.