ला. चव्हाणांच्या आरोपावर सडेतोडपणे उत्तर देत खासदार चिखलीकर यांची टिका नांदेड: सत्तेत असताना त्यांनी केलेल्या कृत्याची आठवण होत असावी त्यातून त्यांनी असे आरोप केले असावेत अशी टीकाही चिखलीकर यांनी केली आहे. स्वतः मुख्यमंत्री असताना चव्हाण यांनी माझ्यासारख्याला संपवण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप चिखलीकरांनी यावेळी केला. चव्हाणांच्या आरोपावर सडेतोडपणे उत्तर देत खासदार चिखलीकर यांनी त्यांच्यावर टीका केली.
धमक्यांना भीक घालणारा नाही: नांदेडचे माजी पालकमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना माझ्या मंत्रिपदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून काही व्यक्तींनी बदनामकारक बनावट पत्र तयार करून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. एवढेच नाही तर माझा विनायक मेटे करण्याचा चंग काही मंडळींनी बांधला असून मी अशा धमक्यांना भीक घालणारा नाही. विशेष म्हणजे अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतः येऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांना निवेदन दिले होते. त्यांच्या निवेदनावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
आव्हानाला प्रत्युत्तर: या प्रकरणात त्यांनी धर्माबाद येथील एका कार्यक्रमात नाव न घेता थेट खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना आव्हान दिले होते. त्यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून खासदार चिखलीकर यांनी मंगळवारी माध्यमांसमोर आपली भूमिका सांगितली. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संपवण्याचे काम त्यांनी केले. ते कदापि त्यांना आता आठवत असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
समोरून वार झेलणारा कार्यकर्ता: गृहमंत्रालयाने अनेकांची सुरक्षा काढली त्यात यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आली. ती सुरक्षा पुन्हा मिळावी यासाठीही त्यांचा हा खटाटोप असेल असा आरोप त्यांनी केला. सुरक्षेसाठी एवढ्या खालच्या थरावर जाऊन टीका करणे हे संयुक्तिक नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा लोकांना जनता माफ करणार नाही. मी समोरून वार झेलणारा कार्यकर्ता असून पाठीत वार करण्याची माझी खानदान नाही असा टोलाही त्यांनी लगावला. कारण मी स्वतः सच्चा आणि सामान्य कार्यकर्ता असून विशेष म्हणजे खानदानी कार्यकर्ता असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी जे पाप केले त्या पापांची कदाचित त्यांना आता आठवण येत असेल असेही खासदार चिखलीकर यांनी बोलून दाखवले.
लेटर पॅडचा दुरुपयोग तक्रार:अशोक चव्हाण यांच्या तक्रारीनंतर नांदेडमधल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यावर पाळत ठेवल्या जात असून, मंत्रीपदाच्या काळातील लेटर पॅडचा दुरुपयोग केल्याची तक्रार काल स्वतः चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर कारेगांव इथल्या सभेत तर चव्हाण यांनी माझा विनायक मेटे करण्याचा काहींचा डाव असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगीतल. तसेच त्यांच्या सुरक्षेचा फेर आढावा घेणार असल्याचे एसपीनी स्पष्ट केले. या गुन्ह्याचा तपास हा उपविभागीय पोलिस अधिकारी अर्थात डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला.
हेही वाचा : Ashok Chavan : मंत्रीपदाच्या लेटरहेडवर अशोक चव्हाणांच्या नावाने बनावट पत्रे; माझा विनायक मेटे करण्याचा डाव, चव्हाणांचा आरोप