नांदेड - केवळ पुढे-पुढे करून पदे पदरात पाडून घ्यायची, कामे न करता फुशारकी मारायची, हे आता चालणार नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोण किती पक्षाचे काम करत आहे हे दिसून येईलच. त्यामुळे आपल्या गावात व बुथवर ज्या कार्यकर्त्याने 'मताधिक्य' घेतले तोच कार्यकर्ता भारतीय जनता पक्षासाठी 'भारी' राहील. या मूल्यमापनावरच त्याचे भविष्यातील पक्षातील स्थानही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील-रातोळीकर यांनी केले आहे.
अर्धापूर तालुक्यातील भाजप तालुका पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, विस्तारक यांची बैठक शंभुनाथ अग्रो प्रोड्युसर कंपनीच्या प्रांगणात संपन्न झाली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील-रातोळीकर, जिल्हा संघटनमंत्री गंगाधर जोशी, जिल्हा सरचिटणीस राजीव गंदीगुडे, लोकसभा विस्तारक रविंद्र पोटगंटीवार, भोकर विधानसभाध्यक्ष प्रविण गायकवाड, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेश देशमुख बारडकर, तालुकाध्यक्ष सुधाकर कदम पाटील, शहराध्यक्ष योगेश हळदे, भाजयुमोचे सचिन कल्याणकर, राजाभाऊ राजेवार, बालाजी मरकुंदे, बाबुराव लंगडे, माधवराव बारसे, सखाराम क्षीरसागर आदी उपस्थित होते.