महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये भाजपचा 'प्रताप'; अशोकरावांच्या' बालेकिल्ल्याची धूळधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यातील भाजप या अभेद्य किल्ल्याला छेदण्यात यशस्वी ठरली आहे. खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण रिंगणात असताना त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपने 'प्रताप' दाखवून त्यांची धूळधाण केली.

अशोक चव्हाण

By

Published : May 25, 2019, 10:21 AM IST

Updated : May 25, 2019, 10:40 AM IST

नांदेड- लोकसभेचा धक्कादायक निकाल यावेळी हाती आल्यामुळे अनेक राजकीय विश्लेषक अचंबित झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यातील भाजप या अभेद्य किल्ल्याला छेदण्यात यशस्वी ठरली आहे. खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण रिंगणात असताना त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपने 'प्रताप' दाखवून त्यांची धूळधाण केली. भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर हे 40 हजार 143 मतांनी विजयी झाले. 'वंचित'ला किंचित समजणाऱ्या काँग्रेसला मात्र, यामुळे राज्यासह जिल्ह्यातही चांगलीच किंमत मोजावी लागली. वंचित बहुजन आघाडीचीच भूमिका निर्णायक ठरली आहे.

अशोक चव्हाण


राज्याच्या राजकारणात अनेक लाटा आल्या आणि गेल्या. नांदेड जिल्ह्यात अशोकरावांचा किल्ला मात्र, भाजपच्या लाटेतही हलला नाही. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही सर्व निवडणुकीत जिल्ह्यावर काँग्रेसचा वरचष्मा कायम राहिला होता.


यावेळची लोकसभा निवडणूकही तेवढी अवघड जाणार नाही, अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना होती. सुरुवातीला त्यांच्या पत्नी भोकर विधानसभेच्या आमदार अमिता चव्हाण ह्या लोकसभेच्या रिंगणात राहणार होत्या. परंतु त्यांच्याबाबतीत काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण दिसत नव्हते. म्हणून ऐनवेळी खुद्द अशोक चव्हाण यांनाच पक्षश्रेष्ठींनी मैदानात उतरवले. इथपासूनच काँग्रेसला ही निवडणूक सोपी नाही, हे दिसून आले. त्यातच वंचित बहूजन आघाडीनेही आपले उमेदवार उभे केल्यामुळे ते नक्कीच भाजपच्या पथ्यावर पडणारे होते.


काँग्रेसकडून खुद्द अशोक चव्हाण रिंगणात असतानाही कार्यकर्ते मात्र या निवडणुकीत हातचा राखून प्रचार करत होते. त्यातच भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचे सर्व पक्षातच मित्र असल्यामुळे त्यांच्या मित्रत्वाचाही चांगला लाभ त्यांना झाला. राष्ट्रवादीची जास्तीत जास्त मदतही भाजपलाच झाल्याचीही चर्चा झाली.


काँग्रेसला सर्वात जास्त फटका बसला तो वंचित आघाडीचा. वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे यांनी तब्बल 1 लाख 66 हजार इतकी मते घेतल्यामुळे हे 'यशच' भाजपच्या पथ्यावर पडले. विविध विधानसभा मतदार संघातही भाजपला मताधिक्य मिळाले नाही. खुद्द अमिता चव्हाण यांच्या भोकर मतदार संघात केवळ चार हजार मतांचीच लीड मिळाली. गतवेळी ती बावीस हजार होती. तसेच दक्षिण मतदार संघातही केवळ पाच हजाराच्या आसपास मताधिक्य मिळाले. केवळ आमदार डी. पी. सावंत यांच्या नांदेड उत्तर मतदार संघात मात्र 30 हजारचे मताधिक्य मिळाले. तर नायगाव, मुखेड, देगलूर या मतदार संघात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांना तीस हजारच्या जवळपास मताधिक्य मिळाले आहे.


टपाली व सर्व मते मिळून भाजपचा 40 हजार मतांच्या फरकाने विजय झाला. तर अशोकराव चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. माजी खासदार व्यंकटेश काब्दे यांच्याकडून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. 25 वर्षाच्या कारकिर्दीनंतर हा पराभव चव्हाण यांच्या जिव्हारी लागणारा आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील भाजपची एन्ट्रीही काँग्रेसला चांगलीच शह देणारी ठरणार आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील राजकारणात अशोकराव विरुद्ध प्रतापराव असा सामना चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत.


उमेदवार निहाय मिळालेली मते

१) प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप)- ४,८६, ८०६

२) अशोक चव्हाण (काँग्रेस)-४,४६,६५८

३) प्रा. डॉ. यशपाल भिंगे (वंचित आघाडी)- १,६६,१९६

एकूण मतदान-११,२९, ४६२

Last Updated : May 25, 2019, 10:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details