नांदेड - कोरोनाच्या आपत्तीमुळे एका कुटुंबाने वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द केला. या कार्यक्रमावर होणारा खर्च प्रधानमंत्री मदत निधीला देण्यात आला आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमाची जवळपास ५१ हजार रुपये रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीला देऊन एका कुटुंबाने एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजविला आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनमुळे ठरलेली लग्ने पुढे ढकलली जात आहेत. तसेच मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ उरकले जात आहेत. कोरोनाच्या सावटामुळे एक मोठे संकट जगात निर्माण झाले आहे. देशात या संकटाच्या निवारणासाठी नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत तर मोठ्या उद्योगपतींपासून गरीब नागरिक आपल्या परीने योगदान देत आहेत.
स्तुत्य उपक्रम.. कोरोनाच्या धर्तीवर एक असाही वाढदिवस..! - पंतप्रधान मदत निधी
कोरोनाच्या आपत्तीमुळे एका कुटुंबाने वाढदिवसांचा कार्यक्रम रद्द केला. या कार्यक्रमावर होणारा खर्च प्रधानमंत्री मदत निधीला देण्यात आला आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमाची जवळपास ५१ हजार रुपये रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीला देऊन एक चांगला आदर्श पुढे ठेवला आहे.
त्यातच नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरच्या धर्मराज देशमुख यांच्या कु. ओजस्विता विराज देशमुख या आपल्या नातीचा आज पहिला वाढदिवस आहे, पण देशमुख कुटुंबाने आपल्या लेकीचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला. तिच्या वाढदिवसासाठी खर्च होणारी ५१ हजार रुपये रक्कम बँकेत जाऊन प्रधानमंत्री मदत निधीत जमा केली आहे.
कोरोनामुळे देशभरात अनेक सोहळे रद्द झाले आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच एका कार्यक्रमाचा खर्च टाळून मदत देण्याची संकल्पना पुढे आल्यामुळे अनेक हात पुढे येतील, अशी अपेक्षा धर्मराज देशमुख यांनी व्यक्त केली आहे. इतर दानशूर नागरिकांनीदेखील या आपत्तीत पुढे येऊन अशा संकटात मदत करावी, असे आवाहन देशमुख कुटुंबाने केले आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून रक्कम केली जमा...!
अर्धापूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून चेकद्वारे पंतप्रधान सहायता निधीमध्ये जमा करण्यात आली. यावेळी शाखा व्यवस्थापक बालाजी बास्टेवाड, मंगेश गावंडे, माजी जि. प. सदस्य धर्मराज देशमुख, अर्धापूर नगरपंचायत गटनेते अॅड. किशोर देशमुख, विराज देशमुख, सखाराम क्षीरसागर, गोविंद टेकाळे, अजित गट्टाणी, प्रफुल्ल मोटरवार आदी उपस्थित होते.