नांदेड -दक्षीण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगावच्या खंडोबाची यात्रा प्रसिद्ध आहे. दरवर्षी या यात्रेला लाखो भाविक येतात. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषात या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेला हौश्या, गवश्या, नवश्यांची यात्रा म्हणूनही ओळखले जाते.
माळेगावच्या प्रसिद्ध अशा खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. देशभरातून या यात्रेसाठी नांदेडमध्ये भाविक दाखल झाले आहेत. खंडोबाच्या ही यात्रा भारतातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते. ही यात्रा ५ दिवस चालणार आहे.
भारतातील सर्वात मोठ्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात जिल्ह्यातील माळेगाव (ता.लोहा) येथे खंडोबाचे पुरातन मंदिर आहे. इथे खंडोबा आणि म्हाळसाकांत यांच्या मूर्ती आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, आदी राज्यातून भाविक खंडोबाचा नवस फेडण्यासाठी येथे येतात. यात्रेनिमित्त हजारो व्यापारी येथे डेरेदाखल झाले आहेत. पंजाब, राजस्थान, गुजरात येथून व्यापारी या यात्रेत येतात.
घोड्यांचा मोठा बाजार
माळेगाव यात्रेत घोड्यांचाही मोठा बाजार भरतो. शिवाय सर्वच प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी व्यापारी इथे ५ दिवस व्यवसाय करतात. ५ दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल माळेगाव यात्रेत होते. हौश्या गवश्या नवश्यांची यात्रा म्हणून ही यात्रा ओळखली जाते. हौशे म्हणजे यात्रेत हौस म्हणून आलेले, गवशे म्हणजे यात्रेत काहीतरी हाती येईल या आशेने आलेले आणि नवसे म्हणजे ज्यांनी खंडोबाला नवस बोललाय ते भक्तीपोटी इथे येतात. या यात्रेत सर्व प्रकारचे पशू व पक्षी असतात. अनेक मालक पाच दिवस या ठिकाणावर तळ ठोकून असतात.