नांदेड -अर्धापूर तालुक्यातील लोणी (खु.) शिवारातील टॉवरच्या बॅटरी बॅक मधून 24 बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. या चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने चोवीस तासांत जेरबंद करून त्यांच्याकडून मुद्देमालासह ५ लाख ५८ हजाराचा माल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी (खु.) येथे गावालगत असलेल्या राजेश निवृत्तीराव लोणे यांच्या शेतात इंडज कंपनीचे टाॅवर आहे. या टॉवरच्या बॅटरी बॅक मधून अमर राजा कंपनीच्या २४ बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी दि. २१ फेब्रुवारी रोजी अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी पोलीस निरीक्षक (स्थागुशा) नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी येथील अधिकारी व अमंलदार यांचे पथक तयार केले. या पथकाने आपला तपास गतीमान करून टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणारा व्यक्ती मौजे लहान येथे असल्याबाबत खात्रीशिर माहिती मिळविली. या माहितीच्या आधारे त्यांनी स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार यांना मौजे लहान येथे पाठवून या प्रकरणातील १) खंडू रामराव बाभुळकर वय ३२ वर्षे, २) गणेश रामराव बाभुळकर वय २७ वर्षे, ३) संदीप सिध्दोजी वानोळे वय २४ वर्षे तिघेही रा. लहान ता. अर्धापूर आणि ४) नवनाथ तानाजी मोहकर (वय ३२ वर्षे रा. चेनापूर ता. अर्धापूर जि. नांदेड) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी राजेश निवृतीराव लोणे यांच्या शेतातील इंडज कंपनीचे टॉवर असलेल्या ठिकाणी बॅटरी बँक मधील अमर राजा कंपनीच्या २४ बॅटऱ्या किंमत १ लाख ५७ हजार रुपये या एका स्कॉर्पिओ गाडी क्र. एम. एच. - २६ एन. ४९४४ मध्ये टाकून चोरून नेल्याचे कबूल केले.