नांदेड -कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे केळीचे दर प्रचंड खाली आले होते. अत्यल्प दरामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा लागवडी खर्च निघणेही अवघड होऊन बसले होते. पण मागील चार दिवसात मागणी वाढल्याने केळीच्या दरात बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. प्रतिक्विंटली 500 रुपये खाली आलेले दर आता, एक हजार रुपये पर्यंत गेले आहेत. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे.
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर परिसरासह केळीचे उत्पन्न घेतले जाते. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली होती. लॉकडाऊनमध्ये दळणवळण व्यवस्था बंद असल्याने केळीची निर्यात थांबली होती. त्यामुळे परराज्यात केळीची मागणी कमी झाली होती. केळीच्या दराने निचांक गाठला होता. मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता होताच आणि परराज्यात केळीची मागणी वाढत असल्याने केळीच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. परराज्यात जाणाऱ्या केळीला ९०० ते एक हजार रुपये प्रतिक्विंटल तर राज्यात जाणाऱ्या ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
चांगले पाऊसमान आणि इसापूर-येलदरी धरणात चांगला पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे केळीची लागवड झाली होती. नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यासह विदेशातही केळीची निर्यात होते. जिल्ह्यातील अर्धापूर परीसरात पिकणारी केळी ही खाण्यासाठी चविष्ट व टिकाऊ असल्यामुळे मोठी मागणी असते.