नांदेड - कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून केळी उत्पादक संकटात सापडला आहे. काही मोजके दिवस सोडले तर दरात फारशी सुधारणा नसल्याचे चित्र होते. संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातून देशातील प्रमुख शहरात व इराणसह अनेक देशात केळीच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. चारशे ते पाचशे प्रतिक्विंटल आलेला दर आता अकराशे पर्यत गेल्यामुळे शेतकऱ्यांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.
हेही वाचा -डोंगरगाव शिवारात बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
यंदाही लॉकडाऊनमुळे दर झाले होते कमी
नांदेड जिल्ह्यातील केळी येण्याचा हंगाम आला आणि टाळेबंदीमुळे संकट केळी उत्पादक संकटात सापडले. व्यापारी कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे केळीचे दर प्रचंड खाली आले होते. अत्यल्प दरामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा लागवडी खर्च निघणेही अवघड होऊन बसले होते. गतवर्षीप्रमाणे यंदाही संकटाचा सामना करावा लागतो की काय? अशी भीती केळी उत्पादक शेतकऱ्यांना सतावत होती.
अकराशे रुपये पर्यंत दर
जळगाव आणि बऱ्हाणपूर या भागात वादळी वारे, गारपीट व पावसामुळे केळीच्या बागा आडव्या झाल्या. त्या भागात जो शिल्लक माल आहे त्याचा दर्जाही तितका चांगला नाही. त्यामुळे, या भागात मोठ्या कंपन्या, व्यापाऱ्यांचा अर्धापूर परिसरात केळीकडे कल वाढला आहे. गत काही दिवसांत मागणी वाढल्याने केळीच्या दरात बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. देशातील विविध कानाकोपऱ्यातून मागणी वाढली आहे. चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळणाऱ्या केळीसाठी अकराशे रुपये पर्यंत दर मिळत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.