नांदेड- लॉकडाऊनमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यात आलेल्या परप्रांतीय मजुरांची स्थिती विदारक आहे. रोजगार बंद पडल्याने हजारो लोक पायीच गावाकडे निघाले आहेत. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाल्यानंतरीही मजुरांची पायपीट सुरूच आहे. या मजुरांच्या मदतीसाठी प्रामाणिक भावनेने पुढे अनेक हात पुढे येतात. मात्र, काही जणांच्या मनात कोरोनाची चुकचुकली तर मदतीसाठी पुढे येणारे हातही मागे जात आहेत. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने माणुसकी हरवल्याची जाणीव होत आहे.
संपूर्ण देशामध्ये कोरोनामुळे महामारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, अचानक घ्याव्या लागलेल्या निर्णयामुळे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून हजारो नागरीकांची गावाकडे पायपीट सुरू आहे. तर सरकारने या मजुरांना आहे त्या ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले आहे. तरीही मजुरांना त्रास होत असल्यामुळे हजारो मजुरांनी पायपीट करत आपले गाव गाठले आहे.
लॉकडाऊन 3 मेनंतर शिथिल होईल, अशी अपेक्षा ठेवून अनेक प्रवासी व परप्रांतीय कामगार आहे त्या ठिकाणीच थांबले होते. मात्र, लॉकडाऊनची मुदत पुन्हा 17 मेपर्यंत वाढल्यानंतर कामगारांनी गावाची वाट धरली. यादरम्यान शासनस्तराववरून ऑनलाइन परवानगी, रेल्वे, बस अशा कितीही घोषणा होत असल्या तरी श्रमकरी आणि कष्टकरी गरिबांची पायपीट सुरुच आहे.