नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा एकूण २४७कोटी २२ लक्ष रुपयाचा अर्थसंकल्प अधिसभासभेत मांडण्यात आला. समाजापयोगी संशोधनाला चालना देणारा असा हा अर्थसंकल्प दि. ११ मार्चच्या आधीसभा सभागृहातील बैठकीमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली वित्त व लेखा अधिकारी आनंद बारपुते यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.एल.एम. वाघमारे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य आणि अधिसभा सदस्य उपस्थित होते.
अर्थसंकल्पात १५ कोटी ७९लक्ष रुपयांची तूट
एकूण २४७कोटी २२ लक्ष रुपयाच्या या अर्थसंकल्पात १५ कोटी ७९लक्ष रुपयांची तूट आहे. गत वर्षीच्या अर्थसंकल्पात ४१कोटी ४४ लक्ष रुपयांची तुट होती. या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थी, विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयेयांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.
नवीन आंतरविद्याशाखीय संशोधन कार्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी
विद्यापीठांमध्ये ‘सेंट्रल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटीज फॉर मल्टीडिसिप्लनरी रिसर्च अँड इन्वोव्हिटीव्ह’ च्या स्थापनेसाठी ११ कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. सेंट्रल कॉम्प्युटिंग फॅसिलिटीजसाठी १.५ कोटीची तरतूद आहे. या दोन्ही सेंटरचा उपयोग विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दोन्ही केंद्रामुळे मूलभूत, समाजापयोगी, नवीन आंतरविद्याशाखीय संशोधन कार्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध होणार आहेत. यामुळे संशोधनाला चालना मिळेल व औद्योगिक प्रकल्प यामधून तयार होतील.
‘रिसर्च असोसिएट’च्या मानधनामध्ये २० लक्षाची तरतूद
संकुलातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी ‘रिसर्च असोसिएट’ या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मानधनामध्ये २० लक्षाची तरतूद करण्यात आलेली आहे. ‘कुलगुरू सहाय्यता निधी’ या योजनेकरिता १५ लक्ष रुपयांची तरतूद केली आहे.‘विद्यार्थी दत्तक योजना’ करिता १५ लक्ष. ‘सॉफ्टस्किल अँड पर्सनालिटी डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग’ करीता २५ लक्ष. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कक्षात परदेशी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी देण्याकरिता १० लक्ष. ‘स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास केंद्र’ करिता २० लक्ष. ‘स्टुडंट्स वेल्फर अँड अवार्ड स्कीम’ म्हणजेच ‘श्वास’ करिता २० लक्ष. पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चासत्रासाठी पेपर सादरीकरणासाठी १५ लक्ष. ‘कमवा व शिका’ योजनेंतर्गत २० लक्ष. खेळाडू विद्यार्थ्यासाठी पारितोषिक योजना करिता ५लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.