नांदेड Asim Sarode On NCP Dispute :राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गटानं निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले आहेत. निवडणूक आयोग 6 ऑक्टोबरपासून राष्ट्रवादीतील वादावर सुनावणी घेणार आहे. मात्र, अजित पवार गटातील नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन बाहेर पडले आहेत. त्यामुळे अजित पवार गटातील नेते अपात्र ठरतील, असं भाकित कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी वर्तवलं आहे.
काय म्हणाले असिम सरोदे :शिवसेनेच्या सत्ता संघर्षानंतर आता राष्ट्रवादी पक्षाच्या सत्ता संघर्षाची सुनावणी 6 ऑक्टोबरपासून निवडणूक आयोगाकडं होणार आहे. सध्या राज्यात सत्ता हडप करण्याचं तंत्र एकनाथ शिंदे यांनी अस्तित्वात आणलं. तेच आता राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार आणि खासदारांनी पक्षविरोधी कारवाई केलेली आहे. त्यामुळे हे सर्व अपात्र ठरू शकतात, असं मत असिम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे.
निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर करते काम :निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार वागताना दिसत आहे. त्यामुळे सर्व काही कायद्यानुसारच होणार असं काही नाही, असंही असिम सरोदे यांनी स्पष्ट केलं. बेकायदेशीर देखील होऊ शकते, असही सरोदे म्हणाले. निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोपही असिम सरोदे यांनी केला. अजित पवारांसोबत गेलेले आमदार खासदार अपात्र ठरु शकतात, अशी कायद्यात तरतुद आहे. मात्र सगळं काही कायद्याप्रमाणचं होईल, असं नाही. निवडणूक आयोगानं कायद्यालाच चुना लावल्याचा आरोपही यावेळी कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी केला.
अजित पवार यांची बाजू बेकायदेशीर :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार आणि खासदार यांची बाजू संवैधानिकदृष्ट्या कायदेशीर आहे. अजित पवार यांची बाजू बेकायदेशीर आहे, असं मत असिम सरोदे यांनी व्यक्त केलं. परंतु निवडणूक आयोग याबाबत काय निकाल देईल, हे पाहणं महत्वाचं आहे. राजकीय नेते संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य करतात. अजित पवार यांनी संविधानाचं 10 वं परिशिष्ट वाचावं, असा सल्लाही असिम सरोदे यांनी अजित पवार यांना दिला. त्यामुळे अजित पवार यांनी पक्षविरोधी कारवाई करुन आमदार आणि खासदार सोबत नेले आहेत, असा दावाही असिम सरोदे यांनी केला.
हेही वाचा :
- Jayant Patil On Ajit Pawar: अजित पवारांबाबत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं समाधान, म्हणाले...
- Ajit Pawar VS Sharad Pawar : रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई; शरद पवार गट आक्रमक, आगामी निवडणुकीत 'रिटर्न गिफ्ट' देण्याचा इशारा