नांदेड - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इसापूर धरणातील आपले हक्काचे पाणी पळवण्याच्या प्रयत्नात आहेत. असे झाले तर नांदेड जिल्ह्यासह भोकर, अर्धापूर व मुदखेडचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरावे. मी या आंदोलनात तुमच्या सोबत आहे. असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अर्धापूर येथील काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अर्धापूर शहर व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजीत मेळावा
यावेळी बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले, इसापूरचे पाणी वळवण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हा निर्णय नांदेड जिल्ह्यासाठी नुकसानकारक असून आजघडीला मिळणाऱ्या पाण्यापैकी केवळ ३५ टक्के पाणी यापुढे आपल्याला मिळणार आहे. या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच जल प्राधिकरणाकडे देखील धाव घेतली आहे. पण आम्ही विरोध केलेल्या या निर्णयाला समर्थन करणारेही काही लोक आहेत. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी अप्पर पैनगंगेच्या पाण्याचा निर्णय तसाच राहू द्यावा असे पत्र जल प्राधिकरणाकडे दिले आहे. हेमंत पाटील आज जरी हिंगोलीचे खासदार असले तरीही त्यांचा मतदारसंघ हा पुर्वी नांदेड दक्षिण होता हे ते विसरलेले दिसतात, असा टोला देखील त्यांना यावेळी लगावला.
कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेसचे कार्यकर्ते
चव्हाण पुढे बोलतांना म्हणाले, या प्रश्नावर नांदेडच्या खासदारांनीही मौन बाळगले आहे. अप्पर पैनगंगेच्या निर्णयावर त्यांनी काहीतरी बोलले पाहीजे. याविषयाचे त्यांनी समर्थन करावे किंवा निदान विरोध तरी करावा, आम्ही त्याचे स्वागत करु. मात्र, सध्या सोयीचे राजकारण सुरु आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. नांदेडच्या आयुक्तालयाचा प्रश्नही मागील पाच वर्षांपासून रखडलेला आहे. आयुक्तालयाचे निर्माण करण्याचा निर्णय कधीचाच घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करावी, विकासकामाच्या आड आम्ही येणार नाही. आयुक्तालयाचा निर्णय मार्गी लावावा आम्ही त्याचे स्वागतच करु असे देखील चव्हाण यांनी सांगितले.
सध्या मराठवाड्यात दुष्काळजन्य परीस्थीती आहे. पावसाळा सुरु होवून दोन महिने झाले तरी जिल्ह्यात पाऊस नाही. शेतकऱ्यांवर दुबार - तिबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि कर्ज माफीचे पैसे शेतकऱयांच्या खात्यावर जमा करावे. अन्यथा महाराष्ट्र भरात आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी अशोकराव चव्हाणांनी सरकारला दिला आहे.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी आमदार डी.पी.सावंत, आमदार वसंतराव चव्हाण, आमदार अमिताताई चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी सभापती बी.आर.कदम, अॅड. हरीभाऊ शेळके, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, युवकचे लोकसभाध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर, तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे पाटील, शहराध्यक्ष राजु शेटे, नगराध्यक्षा सुमेरा बेगम शेख लायख, उपनगराध्यक्षा डॉ.पल्लवी लंगडे आदी उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा.संतोष देवराये यांनी केले. तर प्रास्तावीक शहराध्यक्ष राजू शेटे यांनी केले. तर आभार तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे यांनी व्यक्त केले.