नांदेड- अनेक जण काँग्रेस कार्यकर्त्यांना म्हणत आहेत. झालं गेलं विसरून जा आणि परत कामाला लागा. मात्र विसरले तर काय फायदा ? आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरात कामाला लागा, असा कानमंत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला. ते अर्धापूर येथील ईद-ए-मिलाप कार्यक्रमात बोलत होते. इसापूर धरणाच्या पाण्यासाठी लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
निवडणुकीत मुस्लिम समाजाने खंबीर साथ दिली, असे सांगत अशोक चव्हाणांनी मतदारांचे आभार मानले. पुढे ते म्हणाले, जिल्ह्यात विविध समाजबांधवांनी मला चांगली मदत केली. पण आपल्याच काही जवळच्या माणसांनी दगा दिला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मी कधीही खचणारा माणूस नाही- अशोक चव्हाण
ज्यांनी गद्दारी केली त्यांचेही आभार मानत आहे, असे म्हणत त्यांनी पक्षांतर्गत असलेल्या विरोधकांनाही चिमटाही काढला. जीवनात अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या. मात्र मी कधीही खचणारा माणूस नाही. माझ्यातील जिद्द अजून कायम आहे. मी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करणार आहे. काही उणिवा असतील तर त्या शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण म्हणाले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने मते घेवून काँग्रेस आणि स्वतःचे नुकसान करून घेतले. त्याचा फायदा मात्र भाजपला झाला. त्यामुळे मतदारांनीही हे गणित समजून घेतले पाहिजे.