नांदेड - मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची भूमिका दुतोंडी आहे, त्यांच्या कथनी आणि करणीत फरक असल्याची घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार नांदेड येथे आले होते. मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणावर देखील त्यांनी भाष्य केले.
आरक्षणा बाबत महाविकास आघाडीची भूमिका संशयास्पद-
मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाविकास आघाडीची आतापर्यंतची भूमिका संशयास्पद ठरलेली आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यसरकारने कसलेच प्रयत्न केले नाहीत. या सरकारला चांगले वकील नेमता आलेले नाहीत. याबाबत उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रवृत्ती 'तोंडात गोड, मनात खोड' अशीच असल्याची खरमरीत टीका माजी मंत्री आशिष शेलार यांनी नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, इंद्रा साहनी केसचा फेरविचार करावा, तर मग मनमोहन सरकारच्या काळात तुम्ही काय कले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कायदा केंद्रानेच करावा, तरच आरक्षण मिळू शकतं तर तुम्ही पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात तुम्ही का नाही केले? असेही प्रश्न त्यांनी यावेळी बोलताना निर्माण केले.
पत्रकारांशी संवाद साधताना भाजपा नेते आशिष शेलार... ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकारवर निशाणा-
ओबीसींच्या निवडणूकीतील आरक्षणाला नख लावण्याचं काम उद्धव ठाकरे सरकारने केलं असल्याची जोरदार टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलीय. ठाकरे सरकारच्या निष्काळजीपणामुळे सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकलं नाही. त्यामुळे आता तरी सुधरा असे आवाहन भाजपकडून करत असल्याचं शेलार म्हणाले.