नांदेड -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात काही निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र कोरोना नियमांचे पालन न झाल्यास, येणाऱ्या काळात लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घेण्यात येऊ शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचे असल्यास नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी १२ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते २१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत जाहीर केलेल्या निर्बंधांबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी माझ्याकडे आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून 200 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. परिस्थिती अद्याप हाताबाहेर गेलेली नाही, मात्र काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लागू केलेले निर्बंध हे नागरिकांच्या सुरक्षेसाठीच आहेत, त्यांचे पालन करावे. कोरोना नियमांचे पालन केल्यास आपण कोरोनापासून दूर राहू शकतो.
'आपले कुटुंब, आपली जबाबदारी'