नांदेड :आसना नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हजारो हेक्टर जमीन ही पाण्याने खरडून गेली असून पुराच्या पाण्याखाली पिकांचे नुकसान झाले आहे. नांदेड वसमतकडे जाणारा रस्ता आसना पुलावरून जातो. आसना नदीला पूर आल्यामुळे प्रवाशांना सावंगी येथील आसना पुलावरून मालेगावमार्गे वसमत, परभणी, हिंगोलीमार्गे औरंगाबादकडे जावे लागत आहे. त्यामुळे तब्बल 18 किलोमीटरचा प्रवास प्रवाशांना अधिकचा करावा लागत आहे. मागीलवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसना पुलाचे भूमिपूजन केले होते; पण अद्यापही पुलाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे हा रस्ता बंद झाल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिल्या.
७२ गावांचा संपर्क तुटला :नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात ७२ गावांचा संपर्क तुटला आहे. चार जणांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर दोन जणांना वाहून जाताना वाचवण्यात यश आले आहे. जिल्ह्यात 24 तासात एकूण ४६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नांदेड शहरासह किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, बिलोली, अर्धापूर, देगलुर, बिलोली या तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक रस्ते बंद तर वाहतूक ठप्प झाली आहे. या पावसामुळे हजारो हेक्टर जमीन खरडून गेली आहे. तर धर्माबाद तालुक्यात 70 घरातील लोकांनी स्थलांतर केले. अर्धापूर लोणी गावातील मंदिरात अडकलेल्या लोकांना काढण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात कोणीही आपला जीव धोक्यात घालून जाऊ नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार देण्यात आल्या आहेत. शहरालगतच्या आसना नदीला पूर आल्याने नदी काठच्या पिंपळगाव, शेळगाव या गावात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले :किनवट तालुक्यात इस्लापूर आणि शिवणी मंडळात रात्रीपासून संततधार पाऊस असल्याने या गावात पुराचे पाणी शिरले. मौजे दूधगाव, प्रधानसांगवी या गावांमध्ये काही घरे पाण्याखाली गेली. सुवर्ण धरणाचे बॅकवाटर किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ गावात असल्यामुळे पाणी गावात शिरले. खबरदारीचा उपाय म्हणून तेलंगणा येथील प्रशासनाशी समन्वय साधून या धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. अप्पारावपेठ ते गोंडजेवली, मलकजाम ते शिवणी, अप्पारावपेठ ते मलकाजम, गोंडजेवली ते दयाळ, धानोरा आदी रस्त्यांवर पाणी असल्याने वाहतूक बंद झाली. इस्लापूर येथे साईबाबा मंदिराजवळ पुराच्या पाण्यात अडकलेल्या नाल्याचे पाणी पुलावरून जात असताना 55 वर्षांचे फर्दूके हे व्यक्ती पाण्यात अडकले होते. येथील तलाठी बालाजी वसमतकर यांनी सुरक्षिततेसह पाण्यात उतरून या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढले. पाण्याचा प्रवाह लक्षात घेता जेसीबीची मदत घेऊन या व्यक्तीला वाचवण्यात आले.