नांदेड -राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असते तर त्यांनी मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असती. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडायला कमी पडले. जोपर्यंत आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आहेत, तो पर्यंत मराठा समाजाला कदापि आरक्षण मिळणार नाही, अशी टीका करत खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. नांदेड येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
चिखलीकर म्हणाले की, खासदार असताना अशोक चव्हाण यांनी पाच वर्षात एकही प्रश्न संसदेत उपस्थित केला नाही. माझ्याकडून प्रत्येक अधिवेशनात प्रश्न मांडले गेले आहे. आमदार अमर राजूरकर हे केवळ मालकाला खुश करण्यासाठी बोलतात, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून लाथा खाऊन काँग्रेस बेशरमपणाने सत्तेत -
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर नुकतीच मार्मिक टिप्पणी केली होती. या संदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांला उत्तर देताना भाजपचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून लाथा खाऊन काँग्रेस बेशरमपणाने राज्य सरकारमध्ये सत्तेत आहे. आघाडी सरकारमध्ये मंत्री एक बोलतात, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वेगळेच बोलतात. राज्यात मागच्या वेळी तरी चुकून एक खासदार निवडून आला होता. पुढच्या वेळी तर तीही परिस्थिती राहणार नाही. असा टोला खासदार चिखलीकर यांनी लगावला आहे.