नांदेड - अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधनाची अर्धी रक्कम पेन्शन म्हणून देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, जिल्हाध्यक्ष अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा हेही वाचा-शबरीमला मंदीर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने नेमले नऊ सदस्यीय खंडपीठ
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने शहरातील कलामंदिर भागातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामार्गे जि.प. कचेरीवर धडकला. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात विविध २७ मागण्या करण्यात आल्या आहेत.
यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सेवेचे फायदे द्यावेत. केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, हरियाणा या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढविण्याचे आश्वासन पूर्ण करावे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजनेची अंमलबजावणी करावी. ऑक्टोबर २०१८ ते जुलै २०१९ च्या मानधनवाढीच्या फरकाची रक्कम त्वरीत द्यावी. दिवाळीची भाऊबीज देण्यात यावी. सीम कार्ड रिचार्जसाठी नवीन दर लागू करावेत. रिक्त जागेवर मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीसांची तत्काळ नियुक्ती करावी. मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविका म्हणून दिलेली नियुक्ती सेवा सलग धरून सेवेचे फायदे देण्यात यावेत. मिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अंगणवाडी सेविकेएवढे मानधन देण्यात यावे. त्यांना सुट्या देण्यात याव्यात. सेवा समाप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दुसरे दिवशी लाभ द्यावा. किनवटच्या बाल विकास प्रकल्पाचे अधिकाऱ्यांकडून वयस्कर सेविकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक तत्काळ थांबवावी मुखेड प्रकल्पातील प्रशिक्षणाच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी जि.प. परिसर दणाणून गेला.
या मोर्चासाठी ग्रामीण भागातील अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, जिल्हाध्यक्ष अशोक जाधव याच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.