नांदेड - एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी काम करीत आहेत. या महिला कर्मचाऱ्यांना जुलै महिना संपला तरी अजून जून महिन्याचेच मानधन मिळालेले नाही. त्यामुळे राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहेत. जून व जुलैचे थकीत मानधन देऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबाची होणारी उपासमार थांबवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला.
११ सप्टेंबर २०१८ रोजी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रूपये, मिनी सेविकांच्या मानधनात १२५० रुपये आणि मदतनीसांच्या मानधनात ७५० रूपयांची वाढ करण्यात आली. ऑक्टोबर २०१८ पासून ही वाढ लागू करण्याचे शासकीय आदेश केंद्र सरकारने काढले आहेत. ही मानधनवाढ पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. मात्र, आता दहा महिने होऊन गेले तरीही राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजपर्यंत ही मानधनवाढ दिलेली नाही.