नांदेड:प्राचीन काळात नांदेड हे एक महत्वाचे नगर म्हणून मानले गेले आहे. येथे काही राजधान्या व उपराजधान्या ही होत्या, असे अभिलेखीय पुराव्यावरुन दिसते. कंधार ही राष्ट्रकूट घराण्याची तर होट्टल ही काही काळ कल्याणी चालुक्याची राजधानी होती. राष्ट्रकूटानंतर या भागावर राज्य केले ते कल्याणी आणि चालुक्यांनी. त्यांच्या काळात अनेक मंदिराची उभारणी होट्टल व परिसरात ( Nanded Hottal Ancient Temples ) झाली. ही केवळ मंदिरे नाहीत तर शिल्पदृष्ट्या आणि वास्तु स्थापत्यदृष्ट्या तेवढीच कल्पक आहेत. एक समृध्द वारसा नांदेडला मिळालेला आहे. होट्टलमधील ही मंदिरे कुठल्या देवाच्या दर्शनासाठी नाही तर दगडातून देव साकारणाऱ्या माणसाच्याच कलासामर्थ्याची ओळख करून देतात. पाहुयात आमचे नांदेडचे प्रतिनिधी नागोराव भांगे यांचा विशेष रिपोर्ट..
नांदेड परिसरातील शिल्पकारांचे कलासामर्थ्य : होट्टल हे देगलुर तालुक्यातील प्रत्यक्ष देगलुर पासुन 12 कि.मी. अंतरावर असलेले गाव आहे. प्राचीन कालखंडातील म्हणजे हजार बाराशे वर्षांपूर्वी चालुक्य नृपतीची चहलपहल असलेली पोटलनगरी. या पोट्टलनगरीत इ.स. 1070, 1103 आणि 1120 या 50 वर्षातले तीन शिलालेख आहेत. इथल्या मंदिराना दिलेल्या दानाची नोंद या शिलालेखात आहे. याचा सरळ अर्थ असा निघतो की, इ.स. 1070 पुर्वी ही देवळे बांधली गेली आहेत. आजपासून बाराशे वर्षापूर्वी नांदेड परिसरातील शिल्पकारांचे कलासामर्थ्य या होट्टलमधील अवशेषांनी जोपासले आहे.
होट्टल ऐतिहासिक वारसा : होट्टल येथे प्रत्यक्ष ऐतिहासिक पुरावा म्हणून १,००० वर्षापूर्वीचे संस्कृत भाषेतील मराठी, कानडी लिपितील चार शिलालेख आहेत. या मूर्ती अविष्कारात अप्रतिम नृत्य आविष्कार दर्शविणाऱ्या नर्तकीच्या मनमोहक मुर्ती, प्राचीन काळात वापरलेल्या वाद्यांचा अप्रतिम आविष्कार इथे दिसतो. मृदंग, वीणा, इतर वाद्ये लक्षणीय आहेत. मुर्तीच्या रेखाटनातील तालबध्दता, आकार, गतीशिलता, कमनियता उल्लेखनिय आहे. वेषभूषा, केशभूषा, अलंकार मन वेधून घेतात. हा शिल्पाविष्कार मंदिरांच्या अंगोपांगावर घडलेला असला तरी त्यात धर्मश्रध्देबरोबरच धर्मापेक्षा जास्त कला आविष्कारांचा भाग अधिक लक्षणीय आहे.