नांदेड - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काल (शुक्रवार) संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. हे आंदोलन सकल मराठा समाजाचे असून या आंदोलनामध्ये लाखो मराठा बांधव व मराठा समाजातील संघटना, समाजातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तरी अशोक चव्हाण यांनी नांदेड येथील आंदोलन हे भाजपाप्रणीत असल्याचा आरोप केला होता. तो आरोप बिनबुडाचा आहे, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे राज्याचे समन्वयक माधवराव पाटील देवसरकर यांनी दिली आहे.
आंदोलनात सर्व पक्षाचे नेते उपस्थित -
नांदेड येथे काल संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात भव्य मराठा आरक्षण मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा खासदार हेमंत पाटील, शिवसेना आमदार राम पाटील रातोळीकर, भाजपा आमदार मोहन अण्णा हंबर्डे, काँग्रेस आमदार माधवराव पाटील जवळगावकर, काँग्रेस आमदार तुषार राठोड, भीमराव केराम, भाजपा आमदार बालाजी कल्याणकर, शिवसेना जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, काँग्रेस महापौर मोहिनी येवणकर, काँग्रेस पक्षाचे तीनही जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे तीनही जिल्हाध्यक्ष, भाजपाचे चारही जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष यांच्यासह विविध पक्षाचे जिल्हाध्यक्ष, मराठा समाजातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, माजी आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील विविध गावचे सरपंच चेअरमन यांच्यासह मराठा समाजातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले आहे.