नांदेड - भाजप सरकार हे 'लोकांचे संसार उभे करणारं नव्हे,तर संसार उद्ध्वस्त करणारं सरकार आहे'. म्हणूनच गेल्या ५ वर्षांत माझ्या १६ हजार शेतकरी भगिनी विधवा झाल्या आहेत, असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज नांदेडमध्ये आली. यावेळी किनवटमध्ये आयोजित सभेत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. लोकांनी मोठ्या विश्वासाने ५ वर्षांपूर्वी भाजपला निवडून दिले. मात्र, त्यांनी जनतेची निराशा केली. या सरकारने काहीच काम केले नाही. नुसती जाहिरातबाजी केली. हे सरकार लोकांचे संसार उभे करणारं नव्हे, तर संसार उद्ध्वस्त करणारं आहे, असे म्हणत अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला. गेल्या ५ वर्षात राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही पवार यावेळी म्हणाले.