नांदेड -देशाच्या हवाई दल प्रमुखपदी विवेक राम चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. १ ऑक्टोबरला ते पदभार स्वीकारणार आहेत. भारतीय हवाई दलाचे विद्यमान प्रमुख आर.के.एस भदौरिया हे 30 सप्टेंबर रोजी सेवा निवृत्त होणार आहेत.
विवेक चौधरी यांचे कुटुंब हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हस्तरा या गावचे आहे. नांदेडच्या या सुपुत्राने गगनभरारी घेतल्याने जिल्ह्यासह गावकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला.
- १९८२ साली हवाई दलात रुजू -
विवेक राम चौधरी हे नॅशनल डिफेन्स अकादमीचे विद्यार्थी आहेत. २९ डिसेंबर १९८२ रोजी ते हवाई दलात रुजू झाले. मिग आणि सुखोई ही लढाऊ विमाने उडवण्याचा ३८०० तासांचा अनुभव त्यांना आहे.
- निजामाच्या काळात हस्तरा गावात होती बाजारपेठ -
नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील कयाधू नदीकाठावर हस्तरा हे गाव वसलं आहे. निजामाच्या काळात या गावात मोठी बाजारपेठ होती, असे म्हटले जाते. पण नंतरच्या काळात सदरील गाव मात्र दुर्लक्षितच राहिले.
- विवेक चौधरींमुळे हस्तरा गाव पुन्हा चर्चेत -
हस्तरा हे गाव गेल्या आठ दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या गावची ओळख महत्वाचीच असते. काही व्यक्तींच्या नावामुळे त्या गावाला ओळख मिळते. गावातील विवेक चौधरी यांच्यामुळे देशभरात हस्तरा हे गाव पून्हा एकदा चर्चेत आले आहे. काळाची पाऊलं ओळखून चौधरी कुटुंबियांनी विविध क्षेत्र निवडली खरी पण त्यांचे कुटुंब हे मूळचे शेतकरी होते.
- गावकऱ्यांचा उर अभिमानाने भरून आला -
विवेक चौधरी यांची हवाई दल प्रमुखपदी नियुक्ती झाल्याची बातमी कळताच हस्तरा येथील ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. देशात तीन महत्वाचे दल आहेत. त्यातील हवाई दलाच्या प्रमुख पदी विवेक चौधरी हे देशाचे प्रमुख म्हणून १ ऑक्टोबरपासून पदभार स्वीकारणार आहेत. हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतलेल्या या गगनभरारीने सर्वांचाच उर अभिमानाने भरून आल्याची प्रतिक्रिया या गावातील नागरिक आनंदराव कदम यांनी दिली.
- हस्तरा येथे विवेक चौधरी यांची शेती आणि घर -
विवेक चौधरी यांचे वडील रामभाऊ गणपत चौधरी हे व्यवसायाने अभियंता होते. त्यांनी हैदराबाद येथे एक कंपनी सुरू केली होती, तर आई मुख्याध्यापिका होत्या. विवेक यांचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद येथे झाले. हस्तरा येथे त्यांची शेती व घर आहे. त्यांच्या शेतामध्ये ३०० वर्षापूर्वी रेणुकादेवीचे मंदिर बांधलेले आहे. आजही त्यांची शेती अवधूत शिंदे हे वाहत आहेत. २०१३-१४ मध्ये विवेक चौधरी हे शेती विक्री करण्यासाठी गावात आले होते, अशी आठवण शिंदे यांनी सांगितली. विवेक यांचे काका काशीनाथ हे हार्डवेअरचे मोठे व्यापारी होते, अशी माहिती त्यांचे चुलत भाऊ संजय चौधरी यांनी दिली.
- पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही केले अभिनंदन -
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही केले अभिनंदन
भारतीय हवाई दलाचे नवनियुक्त प्रमुख एअर मार्शल विवेक चौधरी यांचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अभिनंदन केले. चौधरी कुटूंब मूळचे नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील हस्तरा येथील आहे. नांदेडच्या भूमिपूत्राची ही गगनभरारी अभिमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
हेही वाचा -UPSC 2020 RESULT मुंबई आयआयटीचे विद्यार्थी शुभम कुमार देशात प्रथम; 761 उमेदवार उत्तीर्ण