नांदेड -माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. दिवंगत नाईक यांनी जे हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले होते. ते शेतीमध्ये साकार होताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धत सोडून देत आता आधुनिकतेची कास धरली आहे. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. जगाचा पोशिंदा समजल्या जाणारा शेतकरी आजही आपले कर्तव्य जोपासत जगाला अन्नधान्य पुरवित आहे.
शेती फायदेशीर व शाश्वत -
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. शेती फायदेशीर व शाश्वत होऊ लागली आहे. शेतीचे तंत्र अधिकाधिक समजावून घेतल्याने अनावश्यक खर्च टाळता येऊन शेतीचा विकास घडवून आणता आला. आधुनिक अवजारांचा वापर शेतातील उत्पन्नावर सुधारणा होत आहे. आता शेतीत आधुनिक यंत्राचा वापर करण्याकडे शेतकरी कुटुंबाचा कल वाढला आहे. यातून ट्रॅक्टर, पेरणीयंत्र, रोटाव्हेटर, पंजी, बीबीएफ यंत्र, दोनफाळी नांगर आणि इतर यंत्र यांच्या माध्यमातून शेती केली जात आहे.
नैसर्गिक आपत्तीशी दोन हात -
साधारणपणे पूर्वापारपासून कापूस, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांची लागवड होत असते. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी कोरड्या दुष्काळामुळे पिकांचे नुकसान हे शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजेलेले असतात. ना नफा ना तोटा लावलेला खर्च तेवढा या शेतीतून निघत असतो. यातून बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा, हवामानाचा, बाजारपेठेचा अभ्यास करून शेतीचे नियोजन केल्यास शेती फायद्याची ठरू शकते हे त्यांनी हेरले. यातूनच शेतीत विविध प्रयोग राबविण्यास सुरूवात झाली आहे. आणि आपत्तीशी दोन हात करत शेतकरी हे सर्वांना अन्नधान्य पुरविण्याचे काम करत आहेत.
ठिबक सिंचनाचा वापर वाढला -
बहुतांश भागात धरणाची निर्मिती झाली. त्यामुळे बागायती क्षेत्र वाढले आहे. पण धरणात मुबलक पाणी असूनही ते पाणी सिंचनासाठी पुरत नव्हते. पिकांना पाणी देण्याची जुनी पद्धत असल्यामुळे उत्पादनही वाढत नव्हते. सद्यस्थितीत शेतीत ठिबक सिंचनाचा वापर वाढला आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन उत्पादनही वाढले आहे. तसेच विहीर कृषीपंपामध्ये सोलारचा वापर वाढला आहे.