महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूर्णवेळ प्राध्यापक भरतीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन - नांदेडमध्ये प्राध्यापकाचे आंदोलन

जिल्ह्यात पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती करण्यात यावी, या मागणीसाठी प्राध्यापक परमेश्वर पौळ यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. परमेश्वर पौळ हे तासिका तत्वावर सहायक प्राध्यापक म्हणून काम करतात. जिल्ह्यात पूर्ण वेळ प्राध्यापकांची भरती करण्यात यावी, अशी मागणी ते गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत.

पूर्णवेळ प्राध्यापक भरतीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन
पूर्णवेळ प्राध्यापक भरतीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन

By

Published : Apr 18, 2021, 7:06 PM IST

नांदेड -जिल्ह्यात पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती करण्यात यावी, या मागणीसाठी प्राध्यापक परमेश्वर पौळ यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. परमेश्वर पौळ हे तासिका तत्वावर सहायक प्राध्यापक म्हणून काम करतात. जिल्ह्यात पूर्ण वेळ प्राध्यापकांची भरती करण्यात यावी, अशी मागणी ते गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. मात्र मागणी मान्य होत नसल्याने अखेर त्यांनी नांदेडमधील आपल्या राहात्या घरी पाच दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वरिष्ठ महालिद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांची भरती बंद

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयाच्या स्थरावर सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्यात आलेली नाही. त्याऐवजी तासिका तत्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येत आहे. दरवर्षी तासिका तत्वावरील प्राध्यापकांची जाहिरात देऊन प्राध्यापकांची भरती केली जाते. प्राध्यापकांची नियुक्ती करताना त्यांना अनेक नियम व अटी घातल्या जातात. सध्या त्यांना प्रत्येक तासिकेला 417 रुपयांप्रमाणे मानधन देण्यात येत आहे.

तासिका तत्वावरील प्राध्यापकांची अवस्था मजुरासारखी

रोजनदाराला जसे हजेरी प्रमाणे पैसे दिल्या जातात, तीच अवस्था तासिका तत्वावर नियुक्त करण्यात येणाऱ्या प्राध्यापकांची आहे.उच्च शिक्षण विभाग बंद, सुटी, तसेच परीक्षेच्या कालावधिचे वेतन कपात करून त्यांना तुटपुंजे मानधन वर्षातून एकदा देण्यात येते. परंतु प्रत्यक्षात सीएचबी प्राध्यापकाला पूर्णवेळ प्राध्यापकापेक्षा अधिक काम असते, परीक्षेचे सर्व कामे सीएचबी धारकाकडून करून घेतले जातात परंतु परीक्षेचे मानधन त्यांना देता येत नाही, म्हणून दिले जात नाही. मात्र कधीतरी आपण पूर्णवेळ प्राध्यापक होऊ या आशेने हे प्राध्यापक राबत असतात असे परमेश्वर पौळ यांनी म्हटले आहे.

पूर्णवेळ प्राध्यापक भरतीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन

२०११ पासून प्राध्यापक भरती झाली नाही

पूर्णवेळ प्राध्यापक बनण्याच्या आशेने उमेदिचे दिवस व्यर्थ जातात. मागील अनेक वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने पूर्णवेळ प्राध्यापक भरती झालेली नाही. नेहमी शासनाकडून प्राध्यापक भरतीला स्थगिती दिली जाते. जवळपास २०११ पासून (मध्ये काही काळ सोडला तर) आतापर्यंत प्राध्यापक भरती झालेली नाही. राज्यात जवळपास १५ हजार पदे रिक्त आहेत. काही दिवसांपूर्वी शासनाने ४० टक्के जागा भरण्यासाठी हजारो अटी घालून परवानगी दिली होती. परंतू कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा भरती बंद झाली. नेट-सेट सीएचबी धारकाकडून अनेकवेळा शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री तसेच संबंधित शिक्षण विभागाला प्राध्यापक भरती सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आली आहेत. मात्र शासन सातत्याने मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप परमेश्वर पौळ यांनी केला आहे. तसेच जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यादरम्यान काही झाल्यास त्याची सर्व जबाबदारी शासनाची असेल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

पोळ यांचा भावनिक संदेश

दरम्यान भरतीबाबत शासन निर्णय घेत नसल्यामुळे अन्नत्याग करत असून, आता हा शेवटचाच पर्याय आहे . मित्रांनो, भावनिक होऊ नका . लोकशाहीत न्यायासाठी बलीदान द्यावेच लागते, आतापर्यंत मी केलेला पाठपुरावा कोर्टात द्यावा. माझ्या आई - आबाला याबाबत काही कळू देऊ नका, ते शेवटची घटका मोजत आहेत. असा भावनिक संदेश परमेश्वर पौळ यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारीत केला आहे. दरम्यान उच्चशिक्षण संचालनालयाकडून परमेश्वर पौळ यांच्या उपोषणाची दखल घेण्यात आली असून, कायदा, सुव्यवस्थेच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करून परमेश्वर पोळ यांना अन्नत्यागापासून परावृत्त करावे, असे पत्र उच्च शिक्षण संचालनालयाच्या ( पुणे ) कनिष्ठ प्रशासन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी नांदेड विभागातील सहसंचालकांना पाठवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details