नांदेड :नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचणारे बॅनर अज्ञातांनी लावल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यास कुणीही उपलब्ध होऊ शकले नाही. मात्र भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हेच खरे असल्याचे स्पष्ट केले. मात्र, लावलेले बॅनर हे भांडण लावणारे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अप्रत्यक्षपणे खासदारांनी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हेच मान्य केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र हे खरे आहे मात्र, नांदेड शहरात खोडसाळपणाने बॅनर लावले आहे, असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे.
पन्नास खोके 105 डोके :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वी देशात नरेंद्र राज्यात एकनाथ शिंदे अशा आशयाची पेपरमधे जाहिराती दिल्या होत्या. त्या नंतर भाजपाच्या वतीने नाराजी तीव्र करण्यात आली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाबद्दल कुठलेही वक्तव्य तथा बॅनर न लावण्याच्या सूचना केल्या होत्या. पण तरीही नांदेडमध्ये पन्नास खोके 105 डोके, देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्रच अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले.