नांदेड- शहरातील पीर बुरहान नगर भागातील ६४ वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण २० एप्रिलला दुपारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात ताप, खोकला व दम लागण्याच्या तक्रारीमुळे दाखल झाला होता. या रुग्णावर उपचार सुरू असून पिर बुरहान नगरच्या जवळचा पाच किमी परिसर पूर्णतः सील करण्यात येत आहे.
आज कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीर बुरहान नगर येथील एका ६५ वर्षीय नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला. त्याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर, महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुदेशसिंह बिसेन यांनी दिली. कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर त्यापासून नांदेड जिल्हा दूर होता. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे नांदेड जिल्हा आता तरी सेफ झोनमध्ये होता. परंतु अचानकच बुधवारी एका ६५ वर्षीय नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, नांदेड शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शेजारील सर्व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडत असताना नांदेड जिल्ह्यात मात्र एकही रुग्ण सापडला नव्हता. मंगळवारी पाठवलेल्या नऊ नमुन्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी दिली. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळीच सर्व यंत्रणांची तातडीची बैठक सुरू असून, पीर बुरहाननगर सील करण्याची कारवाई सुरू झाली आहे. मंगळवारी दिवसभरात मराठवाडा विभागात दहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनामुक्त झालेल्या हिंगोली जिल्ह्यात काल एकाच दिवशी सहा राज्य राखीव दलाचे जवान पॉझिटिव्ह आले. त्यांना मालेगाव येथे बंदोबस्त करून आल्यानंतर ही लागण झाल्याचे समजते.
मराठवाड्यात नांदेड जिल्हा सुरुवातीपासून खऱ्या अर्थाने कोरोनामुक्त होता. मात्र, बुधवारी सकाळी पीर बुरहान नगरातील हा रुग्ण कोरोना बाधित झाल्याने नांदेडमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाच्या वतीने या सील करण्यात आलेल्या भागातील जनतेने घरातच राहण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. या सील केलेल्या भागात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संभावित संशयितांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जनतेने घाबरून न जाता, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.