नांदेड -जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोविड-19 रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
बेडबाबत चुकीची अफवा पसरवू नये
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य विभागाकडून वेळोवेळी सर्व बाबींचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार सर्व नियोजन करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी सिद्ध असून, जनतेने आरोग्याची त्रीसूत्री काटेकोर पाळावी असे आवाहन त्यांनी केले. बेडसंदर्भात अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. बेडसह औषध व इतर उपचार साहित्या जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. मी स्वत: विविध हॉस्पिटलला जाऊन भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन आलो आहे. काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणून आवश्यकता नसतांना अनेकांनी दवाखाण्यातील बेड अडवून ठेवले आहेत. केवळ भितीपोटी जर कोणी हे कृत्य करत असेल तर त्याचे समर्थन करता येणार नाही. जे अनावश्यक दवाखान्यात भरती झाले आहे, अशा 10 ते 12 जणांना घरी उपाचार करण्यास सांगून, मी त्यांना सुटी दिली आहे. अशी माहितीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे
जनतेने आजार न लपवता सौम्य लक्षणे आढळली तरी देखील कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी यावेळी केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विलगीकरणात राहून उपचार करवून घ्या. आवश्यकता असल्यास आपल्याला रुग्णालयात दाखल करून उपचार केले जातील. अनावश्यक काळजी करू नका. मात्र कोरोनापासून बचावकरण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे व सॅनिटायिजरचा वापर करणे या त्रीसूत्रीचा वापर करावा असेही त्यांनी म्हंटले आहे.
रुग्णांच्या सोयीसाठी चौकशी कक्ष
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागात कोविड-19 चौकशी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता 24 तास उपलब्ध राहणार असून, येथील दूरध्वनी क्रमांक 02462-229221 असा आहे. रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत, किंवा नाही याची माहिती येथे उपलब्ध करून दिली जाईल. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कार संदर्भातील माहितीसाठी डॉ. अक्षय गव्हाणे याच्यांची 9527895183 या नंबरवर संपर्क साधाना असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.