नांदेड -गोकुळनगर भागात मंगळवारी सराफा व्यापाऱ्याला लूटमार करून अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. श्रीनिवास माणिकराव चिटमलवार असे लूटमार झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
चिटमलवार हे मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी परतले. ते अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये स्कुटी लावत असताना तवेरा गाडीमधून आलेल्या लोकांनी त्यांना घेरले. यावेळी तवेरा गाडीमध्ये काही जण बसून होते, तर ३ जणांनी चिटमलवार यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली. दरम्यान, आरोपींनी चिटमलवार यांना तवेरा गाडीकडे ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिटमलवार यानी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील चैन ओढून घेतली. या घटनेत चिटमलवार यांची सोन्याची चैन (७५ हजार) तसेच पिशवीत असलेले ७० हजार रुपये असे एकूण १ लाख ४५ हजार रुपयांच्या ऐवजासह दुकानाच्या चाव्या, बँकेचे पासबूक, चेकबूक आणि इतर कागदपत्रे पळवळी आहेत.