नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायत कार्यालयातील दोघे जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडले आहेत. यामध्ये एक निरीक्षक व त्याच्या सेवकाचा समावेश आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.
जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायत येथील विवाह नोंदणी विभागामध्ये तक्रारदार आपल्या बहिणीचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळावे यासाठी गेले होते. विवाह नोंदणी प्रमाणपत्रांसाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमा करून विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी तो नगरपंचायत कार्यालयात गेला. यावेळी निरीक्षक बालाजी गणपतराव हराळे (वय ५४) यांनी प्रमाणपत्रासाठी लागणारी फी म्हणून ५०० रुपये आणि लाच स्वरूपात ५०० रुपये असे १ हजार रुपये मागितले. तक्रारदार यांनी दि.१३ ऑगस्ट रोजी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.