नांदेड :पारंपरिक शेतीला फाटा देऊन काही नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील गोविंदराव भरकड या तरुण शेतकऱ्याने केला आहे. गोविंद भरकड यांनी यापूर्वी आपल्या शेतात अनेक पिके घेतली पण जमिन खडकाळ असल्याने उत्पन्न येत नव्हते. त्यामुळे त्यांनी नवीन प्रयोग करण्याचे ठरवले आणि सहा एकर जमिनीवर डाळिंबाची झाडे लावली. अशा जमिनीवर डाळिंबाची लागवड करून यशस्वी प्रयोग केला आहे. गेली दीड वर्ष योग्य नियोजन केल्याने डाळिंबाची बाग आता चांगलीच फुलली आहे. सहा एकरात त्यांना वार्षिक वीस लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे.
रोपवाटिका केंद्रही चालवतात: शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याचे गोविंदराव भरकड या तरुणाने ठरविले होते. स्वतः रोपवाटिका केंद्र चालवत असल्याने त्यांनी डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला. त्यांनी २०२० मध्ये शेतीचे नियोजन करून सहा एकरात एक हजार सातशे झाडे लावली. या काळात अनेक संकटे आली पण योग्य नियोजन केले. तसेच योग्य सल्ला घेऊन डाळिंबाची बाग फुलवली आहे. आता प्रथम वर्षात फळ विक्रीला निघणार असून त्यांना मोठी आर्थिक मदत होण्याची अपेक्षा आहे. भरकड यांची शेती अर्धापूर तालुक्यातील खैरगाव शिवारात २५ एकर वडिलोपार्जित जमीन आहे. भरकड यांनी सहा एकर क्षेत्रावर डाळिंब बाग लावली आहे. तर उर्वरित क्षेत्रात केळी, हळद, ऊस आणि रोपवाटिका केंद्र आहे. रोपवाटिकेत विविध प्रकारची रोपे तयार केली आहेत. डाळिंब बागेतून पहिल्या वर्षात २० ते २५ लाखांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.