नांदेड - जिल्ह्यातील पार्डी (ता.अर्धापूर) येथे २०१७ मध्ये स्वत:च्या जीवाची बाजी लावून नदीत बुडणार्या दोन मुलींचे प्राण वाचवणार्या एजाज अब्दुल रऊफ नदाफ राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने केंद्र सरकारने २०१८ मध्ये गौरवले. त्याच्या शौर्याने नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानचा तुरा खोवला गेला. पण, सध्या एजाजला जगण्यासाठी धडपडावे लागत असल्याचे चित्र आहे. ‘तुला ऐवढा मोठा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तरी, तु मजूरीवर चालला, असे गावातील लोक एजाजला हिनवतात. पण, त्याशिवाय पोटची खळगी कशी भरणार, असा प्रश्न तो लोकांसमोर उपस्थित करतो. शासन, प्रशासनाकडूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून प्रत्येक लाभापासून एजाज यांचे कुटुंब वंचित राहिले आहे.
२०१८ ला मिळाला होता राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार
एजाज हे पार्डी (ता.अर्धापूर) येथील रहिवासी असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. एजाज यांचा आई, वडील व एक भाऊ, बहिण, असा परिवार आहे. एजाज हे घरात सर्वात लहान आहेत. येथे ३० एप्रिल, २०१७ मध्ये एजाजने नदीत बुडणार्या दोन मुलींचे प्राण वाचवले होते. त्यावेळी तो इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. माध्यमांमुळे त्याच्या शौर्याची गाथा सरकारदरबारी पोहचली. २०१८ मध्ये दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोवींद, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते नदाफला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
सर्व स्तरातून कौतूकाचा वर्षाव
यावेळी सर्वस्तरावून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. त्याच्या शिक्षणाचा खर्च केंद्र सरकारकडून करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते. तसेच जिल्हा परिषदेतही बैठकीत एजाज यांच्या कुटुंबाला घरकुलाचा लाभ देण्याचे आश्वासनही दिले होते. पण, प्रत्यक्षात मात्र, त्यांना कोणत्याच गोष्टीचा लाभ मिळाला नाही. सरकार शिक्षणाचा खर्च करणार म्हणून एजाज यांच्या वडिलांनी त्यांना नांदेड शहरातील नामांकित महाविद्यालयात इयत्ता ११ वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.