नांदेड:कोरोना ओसरल्यानंतर सर्वच स्तरातील कामकाज सुरळीत झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या विविध संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रमही सुरु झाला आहे. राज्याच्या विविध विभागातील शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया (Gram Panchayat Election 2022) सुरु झाली असून यात नांदेड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पैकी सर्वाधिक ग्रामपंचायती किनवट तालुक्यातील असून येथे ४७ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. अर्धापूर तालुक्यातील एक, मुदखेड ३, नायगाव ३, लोहा ५, कंधार ३, मुखेड ५ व माहुर तालुक्यातील २४ ग्रामपंचातींचा समावेश आहे.
प्रवर्गातील मतदारच नाही : दरम्यान किनवट तालुक्यातील सक्रुनाईक तांडा व माहूर तालूक्यातील वसराम तांडा या प्रत्येकी सात सदस्यीय ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी अनुसूचित जमातीसाठी तर तीन जागा सर्वसाधारण वर्गासाठी सुटल्या आहेत. विशेष म्हणजे वरील दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील मतदारांची संख्याच नाही. त्यामुळे ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या बंजारा बहुल या गावांतील आरक्षण बदलावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. परंतु या ग्रामपंचायती पेसा कायद्यांतर्गत येत असल्याने प्रशासकीय स्तरावरील आरक्षण बदलता येत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
सात ग्रामपंचायती बिनविरोध : दरम्यान सात ग्रामपंचायती बिनविरोध आल्या आहेत. यावेळी सरपंचपद थेट जनतेतून निवडावयाचे असून वरील ग्रामपंचायती सरपंचपदासह बिनविरोध झाल्या आहेत. त्यात किनवट तालूक्यातील आमडी व राजगड माहूर तालुक्यातील रुपलानाईक तांडा मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा लहान व चिकाळा तांडा मोठा, नायगाव तालुक्यतील परडवाडी व मरवाळी तांडा आणि मुखेड तालुक्यातील पाखंडेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
मतदानासाठी प्रशासन सज्ज :किनवट ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात किनवट तालुक्यातील एकूण ४७ पैकी ४४ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचांसह सदस्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तालुक्यातील आंबडी व राजगड या ग्रामपंचायतीच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध पार पडल्या. सक्रुनाईक तांडा गावच्या ग्रामस्थांनी सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. गावकारभारी ठरविण्यासाठी गेल्या ८ दिवसांपासून तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु होती.अनेक गावांत दुरंगी,तिरंगी लढती होत्या.
बिनविरोध ग्रामपंचायतींना विकासनिधी : तालुक्यातली मोठी ग्रामपंचायत असलेल्या गोकुंदा ग्रामपंचायतीसाठी मोठी चुरस आहे.या ग्रामपंचायतीसह बोधडी, घोटी व इतर ठिकाणच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.आमदार भीमराव केराम यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना २० लाखांचा विकासनिधी देण्याची घोषणा केली होती.त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत आंबडी व राजगड ग्रामपंचायती सरपंचासह बिनविरोध निवडण्यात आल्या. गावात मूलभूत सुविधा नसल्यामुळे सक्रुनाईक तांडाच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.रविवारी ४४ ग्रामपंचायतींच्या थेट जनतेतून सरपंचांसह सदस्यांची निवडीसाठी मतदान होणार आहे.
४४ जागांसाठी ३६१ उमेदवार : सरपंचांच्या एकूण ४४ जागांसाठी ३६१ उमेदवार, तर सदस्यांच्या एकूण ८०८ जागांसाठी ९५७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज केली आहे.मतदान प्रक्रियेसाठी तब्बल ९०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.शनिवारी दि.१७ तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार मो.रफीक,नितीन शिंदे,यादव देवकते,प्रवीण कुमरे,संदीप पाटील,मल्लिकार्जुन स्वामी यांनी मतदान प्रक्रियेतील पथकांना एव्हीएम तसेच इतर साहित्यांचे वाटप केले.
१० बसगाड्या तैनात : निवडणूक कर्मचारी तसेच साहित्याची नेआण करण्यासाठी परिवहन महामंडळाच्या किनवट आगारातील १० बसगाड्या तैनात आहेत.निवडणुका शांततेत, निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी १४ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात १५५ पोलीस कर्मचारी बुथवर,८४ कर्मचारी परिसरात पहारा देणार असून,११४ गृहरक्षक दलाचे जवानही तैनात आहेत.संवेदनशील गावांत अतिरिक्त बंदोबस्त राहाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे यांनी दिली. सर्वच ठिकाणच्या ग्रामस्थांनी आपापल्या केंद्रांवर मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी किर्तीकरण पुजार यांनी केले आहे.