नांदेड- कोरोनाचा उद्रेक वाढला असून दिवसेंदिवस बाधित आणि मृतांचेही प्रमाण वाढत आहे. या भयावह परिस्थितीसमोर अनेकांनी हात टेकले आहेत. मात्र घरातील मुलगा, सून, दोन नाती पॉझिटिव्ह असतानाही हिंमत व इच्छाशक्तीच्या बळावर पार्डी म. (ता. अर्धापूर) येथील 90 वर्षीय आजोबा तुकारामजी देशमुख वडगावकर यांनी कोरोनाला यशस्वी झुंज दिली आहे. खचून न जाता त्यांनी कोरोना विरुद्ध दिलेला लढा आशादायी ठरला आहे.
घरातील पाच सदस्यांना कोरोनाची लागण
अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. (ता. अर्धापूर) येथील तुकाराम देशमुख (वय 90) यांना 14 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा नामदेव देशमुख (वय 61) व सूनबाई मीराबाई (वय 57), नात दीपाली (वय 26), गोपाली (22) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. इतर तिघांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यामध्ये मोठा मुलगा नामदेवराव देशमुख यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच दिवसांनंतर त्यांची तब्येत दुरुस्त झाल्यानंतर त्यांना डिस्टचार्ज देण्यात आला.
ऑक्सिजन सुद्धा लावण्याची गरज पडली नाही
मुलाला डिस्चार्ज मिळतो न मिळतो तो 90 वर्षीय तुकाराम देशमुख यांची तब्येत बिघडली. साधारणपणे रक्तातील सीआरपी सहा असणे अपेक्षित असते, पण तो साठ झाला होता. सिटीस्कोरही आठ वर गेला होता. पण त्यांनी धीर सोडला नसल्याने ऑक्सिजनसुद्धा लावण्याची गरज पडली नाही. त्यांना अतिदक्षता विभागात चार दिवस ठेवण्यात आले होते. त्यानंतर एक दिवस जनरल वॉर्डमध्ये ठेवून डिस्चार्ज देण्यात आला. आज ते कोरोनामुक्त झाले असून तब्येत ठणठणीत झाली आहे. घरातील सर्वही सध्या कोरोनामुक्त झाले आहेत.