नांदेड - यंदाचा पाऊस जिल्ह्यासाठी समाधानकारक झाला आहे. जून महिन्यापासूनच पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ११२ प्रकल्पात ३६६.८७ द.ल.घ.मी म्हणजेच ४९ .१७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातील ३० प्रकल्पात ८३४.०८ दलघमी म्हणजेच ८८.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी गेल्या दोन महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तूर्त तरी मिटला आहे. तसेच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनीदेखील वेळेवर पेरण्या केल्या आहेत. नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील इसापूरच्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातही ५१३.५७ दलघमी (५३.२७ टक्के ) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी इसापूरच्या प्रकल्पात १३.३७ दलघमी (१.४१ टक्के) पाणीसाठा होता. या धरणातून जिल्ह्यातील बरेच क्ष्रेत्र ओलिताखाली असल्यामुळे वर्षभराचा हंगाम अवलंबून असतो.