नांदेड - जिल्ह्यातील सोनखेड येथे ५ वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव पसरला असून याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नांदेडमध्ये पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार, अज्ञात नराधमावर गुन्हा दाखल - नांदेड सोनखेड बलात्कार
नांदेडमधील सोनखेड येथे ५ वर्षीय चिमुकलीचे मंगळवारी सांयकाळच्या सुमारास अपहरण झाले. त्यानंतर ती बुधवारी सकाळी एका शेतात रडताना सापडली. वैद्यकीय चाचणीनंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले.

पीडित चिमुकली मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. मात्र, ती चिमुरडी सापडली नाही. मात्र, बुधवारी सकाळी सोनखेड शिवारातील एका शेतात चिमुकली रडताना सापडली. तिच्या अंगावर कपडेही नव्हते. तसेच तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. त्यामुळे तिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासात उघड झाले आहे. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असली, तरी ती काही सांगण्याच्या मनस्थितीत नाही.
दरम्यान, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच अज्ञात आरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.