नांदेड- जिल्ह्यातील मांडवी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत माजवली आहे. दिसेल त्याला चावा घेत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. बुधवारी रात्री झोपलेल्या ४४ लोकांसह २० जनावरांना चावा घेतला आहे. त्यामुळे लोकांनी रात्र जागून काढली आहे. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मांडवीत बुधवारी आठवडी बाजार भरतो. बाजार संपल्यानंतर संध्याकाळी सर्व गाव झोपेत असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास वारा सुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. उकाड्याने त्रस्त होत असल्याने घरात झोपलेल्या महिला, पुरुष, छोटे मुले बाहेर अंगणात येऊन झोपले होते. त्या दरम्यान एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवत एकामागे एक अशा ४४ लोकांना चावा घेतला. तसेच २० जनावरांनादेखील जखमी केले. त्यामुळे गावात दहशत निर्माण झाली आहे. तसेच नागरिकांनी रात्र जागून काढली आहे.